म्हणे, आम्हीच काढली ‘तक्रार’ पेटी...
By Admin | Updated: January 23, 2015 00:41 IST2015-01-22T23:53:13+5:302015-01-23T00:41:11+5:30
गटविकास अधिकाऱ्यांची माहिती : नवी पेटी बसवण्यास मागतायंत पंधरा दिवसांची मुदत

म्हणे, आम्हीच काढली ‘तक्रार’ पेटी...
कऱ्हाड : येथील पंचायत समिती कार्यालयामध्ये तालुक्यातील लोकांच्या तक्रारी कळाव्यात, या उद्देशाने तक्रार पेटी ठेवण्यात आली होती़ मात्र, काही महिन्यांपासून ती अचानकपणे गायब झाल्याने ‘ही तक्रार पेटी गेली कुठे ?’ असा प्रश्न निर्माण झाला होता. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर ती तक्र ार पेटी कोणी अनोळखी व्यक्तीने नव्हे, तर आपणच स्वत: पेटीचे कुलूप गंजल्याने काढली असल्याची माहिती गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांनी दिली़
फडतरे म्हणाले, ‘तक्रार पेटी उघडल्यानंतर त्यातून तीस तक्रारींच्या चिठ्या मिळाल्या़ त्या तक्रारी ज्या विभागाविषयी होत्या, त्या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना त्या तक्रारींच्या चिठ्या देऊन, योग्य त्या सुधारणा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत; मात्र या गोष्टीला तीन महिने झाले असून, त्या तक्रारीचे आणि त्या पेटीचे पुढे काय झाले, हा संशोधनाचाच विषय आहे.
गटविकास अधिकाऱ्यांना ‘संबंधित तक्रार पेटी कधी बसविण्यात येणार’ असे विचारले असता, फक्त पंधरा दिवसांचा अवधी लागेल, असे त्यांनी सांगितले. काढण्यात आलेल्या तक्र ार पेटीचा अन् तक्रारींचा विषय जर तीन महिने होऊनही एकदाही पंचायत समितीच्या मासिक सभेत निघत नसेल, तर सर्वसामान्याचे प्रश्न आणि तक्रारींचे निराकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांना किती दिवस लागत असतील याचा विचारच न केलेला बरा़ तक्रार पेटीचे कुलूप गंजले म्हणून चक्क पेटीच काढून टाकण्याचा प्रकार म्हणजे, ‘जखम मांडीला अन् मलम शेंडीला,’ असाच प्रकार आहे. नुसते कुलूप काढले असते तरी चालले असते; पण पेटीच हलविण्यात संबंंधितांनी धन्यता मानली़ शिवाय आता तक्रारपेटीएैवजी मदत आणि माहितीकक्ष उभारण्याचे खुद्द सभापती आणि गटविकास अधिकारी यांच्या विचाराधीन आहे. तक्रार पेटी बसवण्यासाठी गटविकास अधिकारी आता पंधरा दिवस लागतील, असे सांगत असतील तर प्रत्यक्षात तक्रारी मार्गी लावायला किती दिवस लागतील, हा भाग वेगळाच़
सर्वसामान्यांच्या तक्रारींचे गांभीर्य जर अधिकाऱ्यांना नसेल आणि हे प्रश्न मार्गी लावण्यास अधिकाऱ्यांकडून तीन-तीन महिने लावले जात असतील, तर अशा अधिकाऱ्यांकडून कर्तव्याच्या अजून काय अपेक्षा केल्या जाव्यात, हा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)
संकल्प कधी तडीस जाणार ...
सभापती देवराज पाटील यांच्याशी बोलून तक्रारपेटीऐवजी माहिती कक्षच उभारण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांनी सांगितले आहे. मात्र, यांनी केलेला संकल्प यंदाच्या वर्षी तरी तडीस जाईल का ? असा प्रश्न दस्तुरखुद्द अनेक पंचायत समिती सदस्यच करीत आहेत.
तक्रारपेटी असती तर
कऱ्हाड पंचायत समितीचा शिक्षण विभाग तर नेहमीच अनेक तक्रारींनी चर्चेत असतो. त्याचाच परिपाक म्हणून सहा महिन्यांपूर्वी एकजण चिरीमिरी घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला रंगेहाथ सापडला. यावरून खरंतर तक्रार पेटीची गरज लक्षात यायला हवी़ तक्रार पेटीलतील तक्रारींकडे योग्यवेळी लक्ष दिले गेले असते तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला येऊन कारवाई करावी लागली नसती़
पंचायत समितीमध्ये ज्यावेळी एखादे काम, त्याविषयी तक्रारी घेऊन आल्यास त्या संबंधित विभागातील अधिकारी तर भेटतच नाही शिवाय तक्रार कुणाकडे द्यायची, हा मुख्य प्रश्न उपस्थित होतो.
- कृष्णत माने, किरपे
आजच्या नवनवीन तंत्रज्ञानाच्या जगात मोबाईलसारखी तंत्रज्ञान हाती आल्याने सर्व सोपे झाले आहे. परंतु एखाद्याला गूपित स्वरूपात जर तक्रार करावयाची असेल तर या तक्रारपेटीची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
- विनायक गायकवाड, शिवडे