खंडाळ्यासाठी दोनशे बेडचे सुसज्ज हॉस्पिटल उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:41 IST2021-05-11T04:41:12+5:302021-05-11T04:41:12+5:30
खंडाळा : ‘खंडाळा तालुकावासीयांसाठी खंडाळ्यातील इंडस्ट्रीने अत्याधुनिक कोरोना हॉस्पिटल उभारण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. दोन दिवसांत जागा निश्चित करावी,’ अशी ...

खंडाळ्यासाठी दोनशे बेडचे सुसज्ज हॉस्पिटल उभारणार
खंडाळा : ‘खंडाळा तालुकावासीयांसाठी खंडाळ्यातील इंडस्ट्रीने अत्याधुनिक कोरोना हॉस्पिटल उभारण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. दोन दिवसांत जागा निश्चित करावी,’ अशी सूचना आमदार मकरंद पाटील यांनी खंडाळा येथे कंपनी प्रशासनाच्या प्रतिनिधींच्या बैठकीत दिली.
सर्व कंपन्यांच्यावतीने यास एकमुखी होकार दिल्याने खंडाळा तालुक्यासाठी सुसज्ज कोविड हॉस्पिटल उभे राहणार आहे. यावेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषेदेचे अध्यक्ष उदय कबुले, सभापती राजेंद्र तांबे, रमेश धायगुडे, तहसीलदार दशरथ काळे, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र कोरडे, पोलीस निरीक्षक महेश इंगळे, उमेश हजारे व सर्व कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. खंडाळा तालुक्यात कंपन्यांनी स्वतंत्र कोविड हॉस्पिटल उभारावे, अशी मागणी खंडाळा तालुक्यातून होत होती. यासाठी खंडाळ्यातील राजकीय व्यक्तींनी ही मागणी लावून धरली होती. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात खा. उदयनराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, नितीन भरगुडे व कंपनीचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. त्यानंतर खंडाळ्यात सर्व कंपनीचे प्रतिनिधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हॉस्पिटल उभारणीचा निर्णय झाला.
आ. मकरंद पाटील म्हणाले, ‘संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करीत आहे. कोरोनाने जगभर कहर केला आहे. लाखो लोकांचा मृत्यू झाला असून, अनेकांना आप्त जणांना मुकावे लागले. लोकांनी सुरक्षिततेची काळजी न घेतल्याने शहरासह ग्रामीण विभागाला विळखा घट्ट होऊ लागला आहे. वाई, खंडाळा तालुक्यांत बाधित रुग्णवाढ संख्या अधिक गतीने वाढत आहे. जिल्ह्यात प्रतिदिन दोन ते अडीच हजार रुग्ण बाधित होत आहेत. मृत्यूदर वाढतोय, रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. कोविड कालावधीत जनतेला आधार मिळावा म्हणून सुसज्ज रुग्णालय उभारणे गरजेचे आहे. शासनाने निर्माण केलेली रुग्णालय कमी पडत आहेत. खंडाळा तालुकावासीयांसाठी सर्व सुविधायुक्त रुग्णालय उभारण्यासाठी कंपन्यांनी पुढाकार घ्यावा. यामुळे रुग्णांना दिलासा मिळेल. ग्रामीण रुग्णालयात आयसीयू युनिट उभारणे गरजेचे आहे. त्याचा उपयोग रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी होणार आहे. एशियन पेंटस कंपनीने खंडाळा ग्रामीण रुग्णालयात आयसीयू बेड देण्याचे जाहीर केले.
१०खंडाळा
खंडाळा येथील बैठकीत आमदार मकरंद पाटील, उदय कबुले, राजेंद्र तांबे, रमेश धायगुडे, दशरथ काळे, माणिकराव बिचकुले, डॉ. अविनाश पाटील, डॉ. रवींद्र कोरडे, पोलीस निरीक्षक महेश इंगळे, उमेश हजारे व सर्व कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.