साताऱ्यातील वेशींवर खड्डे करताहेत स्वागत!
By Admin | Updated: July 18, 2016 00:28 IST2016-07-18T00:24:51+5:302016-07-18T00:28:07+5:30
प्रशासनाची लक्तरे टांगणीला : साध्या पावसानंच डांबर गेलं वाहून; पाठदुखीनं वाहनचालक बेजार

साताऱ्यातील वेशींवर खड्डे करताहेत स्वागत!
सातारा : कोणत्याही गावाची भव्यता, आदर्श प्रशासन, गुणवंत लोकप्रतिनिधींची चुणूक वेशीवरच घडत असते. सातारकर मात्र याबाबतीत दुर्दैवी आहेत. महामार्गावरून कोणत्याही चौकातून शहरात प्रवेश केले तरी भले मोठे खड्डे स्वागतला आहेत. त्यामुळे एसटी परजिल्ह्यातील लोकांच्या तोंडून रस्त्याची लायकी काढताना ऐकावे लागत आहे.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा हे मध्यवर्ती ठिकाणाचे महत्त्वाचे शहर आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूर, बारामती, मराठवाड्यात जाण्यासाठी सातारा शहरातूनच जावे लागते.
सातारा हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या एसटी व खासगी वाहने शहरात येतात. त्यामुळे मोठ्या शहरातील लोकांची साताऱ्याशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले आहेत.
कोल्हापूरहून आलेल्या गाड्या अजंठा चौकातून, रहिमतपूर, विटा येथून येणारे कोडोली, बारामती, सोलापूर, कोरेगावकडून येणारी वाहने बॉम्बे रेस्टॉरंट, लोणंदकडून येणारी वाहने वाढे फाटा, तसेच पुण्याकडून येणारे सैदापूर येथून सातारा शहरात प्रवेश करतात.
या चौकांमधील बहुतांश ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. एक खड्डा चुकवला तर दुसऱ्या खड्ड्यांमधून जावे लागत आहे. त्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. साहजिकच या परिसरात वाहने आल्यावर वाहन चालकांमधून असंतोष व्यक्त होत असतो.
वाहनांचे नुकसान झाल्यास आर्थिक झळ बसतो. मात्र, एसटीत पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशांचे कंबरडे मोडून निघते. त्यातून पाठीमागे ज्येष्ठ नागरिक बसलेले असतील तर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न किती गंभीर होत असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. उखडलेल्या रस्त्यांकडे प्रशासनाने लक्ष देऊन खड्डे तत्काळ मुजवून घ्यावेत, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)