कऱ्हाडकरांनो..कमानीविना स्वागत असो!

By Admin | Updated: March 24, 2015 00:20 IST2015-03-23T22:50:43+5:302015-03-24T00:20:09+5:30

पालिकेला मिळेना मुहूर्त : बांधकामाच्या ठरावाला एक वर्ष पूर्ण; पुढचे काम ठप्पच...--आॅन दि स्पॉट...

Welcome to Karhadarno! | कऱ्हाडकरांनो..कमानीविना स्वागत असो!

कऱ्हाडकरांनो..कमानीविना स्वागत असो!

कऱ्हाड : पाहुण्यांचं स्वागत हे शहरात मुख्य चौकातील कमानींमधून केलं जातं, असं म्हणतात. मात्र, कऱ्हाडकर गेल्या कित्येक वर्षांपासून कमान नसणाऱ्या चौकातूनच प्रमुख पाहुण्यांचं तसेच प्रवाशांचं स्वागत करतायत. कामाच्या मुहूर्ताविना अर्धवट बांधकामाने पडून असलेली कमान ही स्वागताच्या प्रतीक्षेत कोल्हापूर नाक्यावर तशीच उभी आहे. प्रमुख पाहुण्यांचं आणि बाहेरील लोकांचं स्वागत मोठ्या उठावदारपणे करता यावे, यासाठी कमान उभारण्याचा कऱ्हाड पालिकेने निर्णय घेतला. पालिकेच्या निर्णयाचे कऱ्हाडकरांनी देखील त्यावेळी स्वागत केले. पालिकेने स्वागत कमान उभारण्याचा एकमुखी ठराव मंजूर करून कमानीच्या बांधकामासही सुरुवात केली. मात्र, आता वर्ष पूर्ण होऊन गेले तरी या मंजूर कमानीच्या बांधकामास गती मिळालेली नाही. नुसते चार खांब उभारून वर्षभर पालिकेने कऱ्हाडकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले असल्याचे लोकांतून बोलले जात आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचे स्मरण राहावे, म्हणून त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने मिळालेल्या निधीतून ५५ लाख रुपये खर्च करून भव्य स्वागत कमान उभी करण्याचा ठराव पालिकेने मांडला. १६ मार्च २०१३ रोजी पालिकेत मांडण्यात आलेल्या स्वागत कमानीच्या ठरावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. कोल्हापूर नाक्यावर उभारण्यात येणाऱ्या कमानीचे आकर्षक डिझाईन माऊली अर्किटेक्ट अ‍ॅन्ड इंजिनिअरिंग यांच्याकडून घेण्यात आले. या गोष्टीला आता वर्ष पूर्ण झाले आहे. तरी सुध्दा ना कमानीची डिझाईन ना पाहुण्यांचे दिमाखात स्वागत केले जात आहे. या एक वर्षात पालिकेकडून नुसते चार खांब उभारण्याचेच काम झाले असल्याने या प्रकाराबाबत जनतेमधून तीव्र स्वरूपात पालिकेच्या लावलिजाव कामकाजावर ताशेरे ओढले जात आहेत. २०० फूट लांबी अन् ३२ फूट उंची असणारी ही स्वागत कमान चार खांबांच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहे. उभारण्यात आलेल्या खांबांभोवती ग्लायडिंग करून देखभालीसाठी प्लॅटफॉर्म ट्रॅक बनविण्यात येणार आहे. अशी आश्वासने देणाऱ्या पालिकेला आपल्या आश्वासनांचा विसर पडला आहे की काय, हे यावरून दिसून येत आहे.सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या अन् पुण्यानंतर विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या कऱ्हाडला स्वत:ची अशी वेगळी ओळख प्राप्त आहे. मात्र, यासाठी शहरातील मुख्य प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूर नाका परिसरात भव्य अशी स्वागत कमान असावी, अशी कऱ्हाडकरांची सुद्धा अपेक्षा आहे. मात्र, कऱ्हाडकरांच्या अपेक्षांची पूर्तता पालिकेकडून केली जात नसून सुविधांपेक्षा असुविधाच जास्त प्रमाणात निर्माण केल्या जात आहेत.
ग्रामीण भागात छेट्यात छोट्या खेड्यांमध्येसुद्धा कमान असते. मात्र १९८ गावांचा तालुका असणाऱ्या या कऱ्हाड शहराला स्वागत कमान नसल्याचे पाहून व नागरिकांचे स्वागत खड्ड्यांतून अन् पूर्ण नसलेल्या कमानींमधूनच कऱ्हाडकरांना करावं लागत आहे. या स्वागत कमानीच्या कामाला पालिकेकडून कधी मुहूर्त मिळणार, अशी लोकांतून विचारणा होत आहे.

स्वागत, आंदोलन अन् मोर्चेसुद्धा इथूनच...
एखाद्या सामाजिक प्रश्नावर तीव्रपणे पडसाद उमटवताना सामाजिक संघटना, पक्षाकडून कोल्हापूर नाका या मुख्य ठिकाणाहून मोर्चा, रास्ता रोको प्रारंभ केला जातो. तसेच मुख्य कार्यक्रमांचे पाहुणे व विजय मिळवणाऱ्या व्यक्तींचे याच ठिकाणाहून स्वागत केले जाते. कमानीविनासुद्धा या ठिकाणाला जास्त महत्त्व प्राप्त आहे.


आयलँडही दुरवस्थेत
कोल्हापूर नाका येथे असणाऱ्या आयडॉलची ही मोठी दुरावस्था झाली आहे. त्यातील झाडे सुकून गेली असून गवताचे व घाणीचेही प्रमाण वाढले आहे. एक वर्षापूर्वी स्वागत कमानीसह आकर्षक प्लॅटफॉर्म ट्रॅक व सुशोभिकरण याठिकाणी करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत होते.

Web Title: Welcome to Karhadarno!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.