वडूजमधील रस्त्यांना आठवडा बाजाराचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST2021-02-06T05:15:23+5:302021-02-06T05:15:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : आठवडा बाजारासाठी वडूज शहरात बाजार पटांगणाची प्रशस्त जागा असतानाही शेतकरी व व्यापाऱ्यांचा आठवडा व ...

Weekly market eclipse on roads in Vadodara | वडूजमधील रस्त्यांना आठवडा बाजाराचे ग्रहण

वडूजमधील रस्त्यांना आठवडा बाजाराचे ग्रहण

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : आठवडा बाजारासाठी वडूज शहरात बाजार पटांगणाची प्रशस्त जागा असतानाही शेतकरी व व्यापाऱ्यांचा आठवडा व दैनंदिन बाजार रस्त्याकडेलाच भरत आहे. शहराची व्याप्ती पाहता, आठवडा बाजार एकाच छताखाली येणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासनाच्या उदासिनतेमुळे वडूजमधील रस्त्यांना लागलेले आठवडा बाजाराचे ग्रहण काही केल्या सुटेनासे झाले आहे.

खटाव तालुक्यातील इतर बाजारांपेक्षा वडूजची बाजारपेठ सर्वात मोठी आहे. तालुक्याचे मुख्यालय अशी ओळख असल्याने याठिकाणी बाजारासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मोठी गर्दी असते. नागरिकांच्या सोयीसाठी नगर पंचायतीने बाजार पटांगण येथे आठवडा बाजाराचे नियोजन केले आहे. याठिकाणी नगर पंचायतीने क्राँकिटीकरण करून व्यापारी व शेतकऱ्यांना बैठक व्यवस्थाही केली आहे. मात्र, शहराची व्याप्ती पाहता, प्रत्येक प्रभागात ज्याने-त्याने आपल्या सोयीनुसार रस्त्याकडेलाच बाजारहाट मांडला आहे.

बाजार पटांगणातील जागा अपुरी पडत असल्याने वडूजमध्ये शनिवारी भरणारा आठवडा बाजार रस्त्याच्या दुतर्फा भरतो. अनेक विक्रेते बसस्थानक परिसर, भाग्योदय नगर, वडूज-कऱ्हाड रस्त्यालगत व कर्मवीर नगर परिसर या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा भाजीची विक्री करतात. त्यामुळे सातत्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो. यावेळी वाहनचालक व विक्रेत्यांच्यात वादही होतात.

नगर पंचायत नागरिक तसेच विक्रेते, व्यापाऱ्यांकडून कर रुपात महसूल गोळा करते. या पैशातून प्रशस्त व सुुसज्ज भाजी मंडईची उभारणी होऊ शकते. परंतु, प्रशासनाच्या उदासिनतेमुळे रस्त्यावर भरणाऱ्या आठवडा बाजाराचा प्रश्न आजवर सुटलेला नाही. नियोजनाअभावी वडूज शहरातील आठवडा बाजाराचे तीनतेरा वाजले आहेत.

(चौकट)

ग्राहकांची टाळाटाळ...

तालुक्याचे मुख्यालय असल्याने वडूजमध्ये नोकरदारवर्ग मोठ्या संख्येने स्थायिक झाला आहे. बाजार पटांगणावर जावून भाजी खरेदी करण्यापेक्षा घरी जाताना रस्त्याकडेलाच असलेली भाजी खरेदी करणे त्यांना सोयीचे पडते. तसेच बाजार पटांगणात येऊन दैनंदिन भाजी खरेदी करणारे ग्राहक फारच तुरळक असल्याने त्याठिकाणी बसण्यास व्यापारी व शेतकरी टाळाटाळ करतात.

(चौकट)

मंडईची ठिकाणे

शहरातील ज्योतिबा मंदिर परिसर, शहा पेट्रोल पंपासमोर, कर्मवीर नगर रस्त्याच्या दुतर्फा, वडूज बसस्थानकाच्या पाठीमागे आठवडा तसेच दैनंदिन बाजार भरतो.

फोटो : ०५ शेखर जाधव

वडूज शहरातील बाजार पटांगणासह रस्त्याकडेला अशाप्रकारे आठवडा बाजार भरतो.

Web Title: Weekly market eclipse on roads in Vadodara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.