स्ट्रॉबेरीला हवामान पोषक; पण ‘अवकाळी’ घातक
By Admin | Updated: January 2, 2015 00:07 IST2015-01-01T22:52:32+5:302015-01-02T00:07:53+5:30
शेतकऱ्यांमध्ये चिंता : दहा वर्षांत पहिल्यांदाच वातावरणात बदल; नगदी पिकावर उत्पादकांचे बारकाईने लक्ष

स्ट्रॉबेरीला हवामान पोषक; पण ‘अवकाळी’ घातक
सातारा : महाबळेश्वरची ओळख केवळ थंड हवेचं ठिकाण राहिली नसून ते एक ‘स्ट्रॉबेरी लँड’ म्हणूनही ओळखले जाते. स्ट्रॉबेरी हे महाबळेश्वरचे मुख्य पीक. या फळासाठी येथील हवामान देखील अनुकूल आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून हवामानात होत असलेल्या सततच्या बदलामुळे ‘स्ट्रॉबेरी’वर अवकाळी संकट कोसळण्याची भीती निर्माण झाली असून, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये शेतकरी पहिल्यांदाच हिवाळ्यात अशा प्रकारच्या वातावरणाचा अनुभव घेत आहेत.
गेली कित्येक वर्षे येथील शेतकरी स्ट्रॉबेरीचा व्यवसाय करीत आहे. देशात स्ट्रॉबेरीचे सर्वाधिक ८७ टक्के उत्पादन एकट्या महाबळेश्वरमधून घेतले जाते. आज महाबळेश्वर तालुक्यात ४० गावांतील सुमारे दीड ते दोन हजार शेतकरी स्ट्रॉबेरीची शेती करतात. स्ट्रॉबेरी या फळासाठी आवश्यक असणारी थंड हवा, लाल हलकी माती, समुद्र सपाटीपासून ४ हजार ३०० फूट उंची आदी गुणधर्म याठिकाणी आढळतात. यामुळे स्ट्रॉबेरी येथील मुख्य पीक आहे.
‘स्ट्रॉबेरी’ हे थंड हवेत येणारे फळ आहे. मात्र, वातावरणात बदल झाल्यास याचा पिकावरही परिणाम होतो. सध्या वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे या पिकाला धोका निर्माण झाला आहे. थंडीचे प्रमाण अधिक असल्याने व काही ठिकाणी रोपांवरील हिमकणांचे दवबिंदूत रूपांतर होत असल्याने पिके कुजण्याचे प्रकार घडत आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. ढगाळ वातावरणाबरोबरच पाऊस पडण्याची चिन्हे असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हिवाळ्यामध्ये गेल्या अनेक वर्षात प्रथमच अशा प्रकारचे वातावरण निर्माण झाले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
वातावरणातील बदलाचे गणीत सुटेना
महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या दहा-पंधरा वर्षांत हिवाळ्यामध्ये पावसासारखी वातावरणनिर्मिती या अगोदर कधीच पाहावयास मिळाली नाही. स्ट्रॉबेरीसाठी थंड हवामान पोषक असल्यामुळे प्रामुख्याने हिवाळा ऋतूत येथे स्ट्रॉबेरीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र, सध्या वातावरणात होत असलेल्या ससतच्या बदलाचे गणित शेतकऱ्यांना देखील सुटेनासे झाले आहे. ‘अवकाळी पाऊस नको’ एवढीच इच्छा येथील शेतकरी व्यक्त करीत आहे.
पाऊस पडला तर स्ट्रॉबेरीचे नुकसान होणार आहे. सध्या रोपांना फुले आली आहेत. पावसामुळे फुले झडून जातात. तर फळांवरही डाग पडतात. त्यामुळे उत्पादन घटते व मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. याबरोबरच बाजारपेठेतही स्ट्रॉबेरीची मागणी कमी होते.
- श्रीपती भिलारे
स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी, अवकाळी