भ्रष्टाचारी नेत्यांना तुरुंगात पाठवू
By Admin | Updated: October 12, 2014 00:45 IST2014-10-12T00:45:27+5:302014-10-12T00:45:27+5:30
विनोद तावडे : शिरवळ येथे पुुरुषोत्तम जाधव यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेत हल्लाबोल

भ्रष्टाचारी नेत्यांना तुरुंगात पाठवू
शिरवळ : ‘भारनियमनमुक्त महाराष्ट्र करण्याच्या वल्गना करणाऱ्या, शेतकऱ्यांच्या जीवनात अंधार पसरवणाऱ्या अजित पवारांचे सत्तेचे कनेक्शन कापणार आहे. आपण सत्तेवर आल्यावर भ्रष्टाचार करून महाराष्ट्राच्या डोक्यावर तीन लाख कोटींचा डोंगर उभारणाऱ्यांना तुरुंगात पाठवू,’ असा इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते विनोद तावडे यांनी दिला.
शिरवळ येथे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष व अन्य पक्षांचे उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित केली होती. यावेळी ‘भाजप’चे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप क्षीरसागर, सरचिटणीस अनुप सूर्यवंशी, धनगर आरक्षण कृती समितीचे राज्याध्यक्ष हणमंतराव सूळ, सुनील गायकवाड, प्रकाश देशमुख, राहुल हाडके, चंद्रकांत यादव, भूषण शिंदे, निवृत्ती जाधव, नीलकंठ भूतकर, सुभाष क्षीरसागर, ‘रासप’चे तालुकाध्यक्ष कुंडलिक ठोंबरे, अण्णा साळुंखे, गणेश शेटे, कोंडिबा उंब्रटकर, नामदेव दाभाडे, नीशा जाधव, सुनीता हाडके उपस्थित होते.
तावडे म्हणाले, ‘आघाडीने पंधरा वर्षांत राज्याच्या डोक्यावर प्रचंड कर्ज करून ठेवले आहे. प्रतिमाणसी २७ हजारांचे कर्जाचा बोजा लादणाऱ्या भ्रष्टाचारी नेत्यांना आता घरी बसवा. सर्वसामान्यांच्या घामाचा पैसा खाणाऱ्यांना अद्दल घडविण्याचे काम आता मतदार करणार आहेत. तासगावमध्ये बोलताना आर. आर. पाटील एका उमेदवारावर बोलताना म्हणतात की, ‘याला कळत नाही. बलात्कार करायचाच होता, तर निवडणुकीनंतर करायचा.’ हे राज्याच्या माजी गृहमंत्र्याला शोभणारे वक्तव्य आहे काय? अहो आबा आपण काय बोलता, किती बोलता.’
‘राष्ट्रवादीच्या नेत्यांना खाण्याची सवय काका-पुतण्यांनी लावली आहे. राष्ट्रवादीला युती शासनाच्या काळात सुरू केलेली कामे करता आली नाहीत. निवडणुकीपुरते एकाच कामाचे वर्षानुवर्षे नारळ फोडण्याचेच काम राष्ट्रवादी करत आली आहे. राज्यात आजवर ४५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. याला आघाडी शासनच जबाबदार आहे. भारनियमनमुक्त महाराष्ट्र करणार, असे वक्तव्य करणाऱ्यांनी राज्याचे बारा वाजविले. यापुढे राज्यात एकही आत्महत्या होणार नाही. शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांच्या मागे पळावे लागणार नाही. तहसीलदार, कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवकांचे गोपनीय अहवाल भरताना चार शेतकऱ्यांचे चांगले काम केल्याचे प्रमाणपत्र सक्तीचे करणार आहे,’ असेही विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले.
पुरुषोत्तम जाधव म्हणाले, ‘काँग्रेस देशात संपली तशी राज्यातही संपणार आहे. त्यामुळे काँग्रेसचा गट आता भाजपमध्ये येणार आहे. काँग्रेसमधील आयात शिवसेनेचे उमेदवार डी. एम. बावळेकर ही मदन भोसले यांचीच खेळी आहे. काँगेस, राष्ट्रवादीच्या खेळ्या जनतेच्या लक्षात आल्या आहेत. पाच वर्षांत मतदारसंघात विकासाचा नव्हे, तर भ्रष्टाचाराचा धबधबा कोसळला. खंडाळा तालुक्यात ‘सेझ’चे आठ टप्पे आणून येथील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून हक्काचे पाणी बारामतीकडे पाठविण्याचा डाव राष्ट्रवादीचा आहे. हे जनतेच्या लक्षात आले आहे.’ (प्रतिनिधी)