कोंडवे गाव विकास कामातून देशात आदर्श बनवू
By Admin | Updated: November 11, 2014 23:23 IST2014-11-11T21:56:34+5:302014-11-11T23:23:45+5:30
उदयनराजे भोसले : संसद ग्राम दत्तक योजनेस प्रारंभ

कोंडवे गाव विकास कामातून देशात आदर्श बनवू
सातारा : ‘संसद ग्राम दत्तक योजनेत कोंडवे गावाची निवड केली आहे. गावच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. गावात विविध नवनवीन योजना कार्यान्वित करुन गावाला देशपातळीवर आदर्श बनवूयात,’ असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
खासदार उदयनराजे भोसले यांनी दत्तक घेतलेल्या योजनेस आज (मंगळवारी) प्रारंभ झाला. यावेळी त्यांनी गावातील फेरी मारुन अंतर्गत रस्ते, गटारींची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) आनंद भंडारी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवींद्र साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख, पदाधिकारी उपस्थित होते.
श्रीकांत म्हणाले, ‘गावाचा सर्वांगिण विकासासाठी शासन पातळीवर निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. याची सुरुवात स्वत:पासून वैयक्तिक स्वच्छतेपासून करावी लागणार आहे. ’
साळुंखे म्हणाले, ‘गावाचा विकास करताना शासकीय अधिकारी, कर्मचारी आपल्या बरोबरच आहेत. पण ग्रामस्थांनी आपल्यातील अहंकार बाजूला ठेवावा लागणार आहे.’
संदीप शिंदे म्हणाले, ‘शासकीय विभागांनी अनेक योजना आणल्या आहेत. त्याच प्रमाणे त्यांना ग्रामस्थांचे कायम सहकार्य राहणार आहे. गाव आदर्श बनविले जाईल.’ (प्रतिनिधी)