बारावीच्या प्रवेशाला आले... अन् कचरा साफ करून गेले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:43 IST2021-08-14T04:43:39+5:302021-08-14T04:43:39+5:30
औंध : कोरोना काळात सध्या विद्यार्थी आणि शाळा यांचे नाते कमी झाले आहे. घरीच ऑनलाइन अभ्यास असल्याने इतर कलागुणांना ...

बारावीच्या प्रवेशाला आले... अन् कचरा साफ करून गेले!
औंध : कोरोना काळात सध्या विद्यार्थी आणि शाळा यांचे नाते कमी झाले आहे. घरीच ऑनलाइन अभ्यास असल्याने इतर कलागुणांना इच्छा असूनही दीड वर्षे वाव मिळाला नाही, औंध आणि परिसरातील पाच विद्यार्थीमित्र बारावीच्या प्रवेशाला राजा भगवंतराव ज्युनिअर कॉलेजमध्ये आले. प्रवेशाची पूर्तता पूर्ण करून श्रीयमाई डोंगर परिसरात आले व तिथे असणारा तब्बल पाच पोती कचरा, प्लास्टिक गोळा केले. बांधीलकी जपली त्यांच्या या कामाचे समाजमाध्यमातून कौतुक होत आहे.
याबाबतची माहिती अशी की, औंध परिसरातील अविनाश घुटुगडे, चैतन्य इंगळे, अमर वाडेकर, सोहम मुळे, मयूर सपकाळ हे विद्यार्थी प्रवेशाच्या पूर्ततेसाठी औंध येथील राजा भगवंतराव ज्युनिअर कॉलेजमध्ये आले होते. आल्यानंतर एकमेकांची बऱ्याच दिवसांनी प्रत्यक्षात भेट झाली. गप्पा-गोष्टी झाल्या. कागदपत्रांची पूर्तता झाली. आता मंदिर परिसरात जाऊन दर्शन घ्यायचे असे ठरल्यानंतर डोंगरावर मार्गक्रमण सुरू झाले. जाताना रस्त्याच्या कडेला प्लास्टिक कागद, रिकाम्या बाटल्या, कचरा दिसला.
मंदिर बंद असल्याने बाहेरूनच दर्शन घेऊन या पाच विद्यार्थ्यांनी कचरा गोळा करण्यास सुरुवात केली. सुमारे पाच पोती प्लास्टिक कचरा गोळा करून त्यांनी पिशवीत एकत्र भरून ठेवला. त्यानंतरच आपले घर गाठले.
काही वेळाकरिता शाळेत आलेल्या हे विद्यार्थी आपल्या शाळेने शिकवलेली सामाजिक बांधीलकी मात्र विसरले नाहीत, कोरोनामुळे अनेकांना वेळेची बंधने आली, मात्र मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करणे हे या विद्यार्थ्यांनी सर्वांना दाखवून दिले.
प्रतिक्रिया
औंध शिक्षण मंडळाच्या संस्थेत पूर्वीपासून स्वच्छता हा विषय प्राधान्याने शिकविला जातो. प्लास्टिकमुक्त परिसर ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या डोक्यात रुजल्याने व डोंगरावरील प्लास्टिक पर्यावरणाला घातक असल्याने नेहमीच या विषयाकडे लक्ष असतेच. त्यातील एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे.
- प्रा. प्रमोद राऊत
आम्ही बऱ्याच दिवसांनी मित्र अचानक भेटलो. आम्ही डोंगरावर गेलो असता रस्त्याच्या कडेला कचरा प्लास्टिक आढळताच आम्ही पाच जणांनी पाच पोती कचरा गोळा केला. परिसर स्वच्छ केल्याचे समाधान आम्हाला मिळाले.
- चैतन्य इंगळे
विद्यार्थी औंध
फोटो १३ औंध
औंध येथे बारावीच्या प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी मूळपीठ डोंगर परिसरातील स्वच्छता केली. (छाया : रशीद शेख)