कोरेगावसाठी बाह्यवळण रस्ता रामबाण उपाय!

By Admin | Updated: March 8, 2016 00:48 IST2016-03-07T21:57:55+5:302016-03-08T00:48:29+5:30

महिन्याभरात सर्वेक्षण : सातारा-पंढरपूर राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित होणार

Way of a passage to Koregaon! | कोरेगावसाठी बाह्यवळण रस्ता रामबाण उपाय!

कोरेगावसाठी बाह्यवळण रस्ता रामबाण उपाय!

कोरेगाव : सातारा-पंढरपूर राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय सरकारच्या पातळीवर झाला असल्याने आता सध्याचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडे हस्तांतर करणार आहे. कोरेगाव शहराचा विचार करता शहरातून महामार्ग जाणे कठीण असून, पर्यायी बाह्यवळण रस्ता करावा लागणार आहे. महिन्याभरात हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होणार असून, त्यानंतर सर्वेक्षणाचे काम हाती घेतले जाणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सातारा शहरातील पोवई नाका ते संगम माहुली दरम्यान या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, ते सध्या महामार्गाच्या उड्डाणपुलापर्यंत आले आहे. भविष्यात चौपदरीकरणाचे काम कोरेगाव शहरात येण्याची शक्यता लक्षात घेऊन बांधकाम विभागाच्या उच्चपदस्थ अभियंत्यांनी एन.यु.टी. चा प्रस्ताव (ज्याप्रमाणे बी. ओ. टी. असतो) सरकारला सादर केला होता. यामध्ये सरकारने विकासकाला टोलची रक्कम अदा करण्याविषयी महत्त्वाचा उल्लेख होता. साधारणत: २५० कोटी रुपयांचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन देखील होता, तत्पूर्वीच केंद्र सरकारने राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिल्याने आता सर्वच प्रक्रिया रद्दबातल होणार आहे.
संपूर्ण कोरेगाव शहराची बाजारपेठ या राज्यमार्गावर वसलेली आहे. मार्केटयार्डपासून ते सरस्वती विद्यालयापर्यंत दोन्ही बाजूला दुकाने, कार्यालये व व्यापारी संकुले आहेत. सातारा जकात नाका, आझाद चौक, दिवंगत आमदार दत्ताजीराव बर्गे चौक, जुना मोटार स्टँड, पंचायत समिती चौक आदी वर्दळीची ठिकाणे आहेत. बस थांबे, रिक्षा थांबे व वडाप व्यावसायिकांचे थांबे देखील या रस्त्यावर असून, देवदेवतांची मंदिरे देखील रस्त्याच्या कडेला आहेत. शहरातील वर्दळ याच मार्गावर असून, सराफा व्यवसाय देखील या रस्त्यावर आला आहे.
एकंदरीत शहराचा आत्मा असल्याने या रस्त्याला विशेष महत्त्व आहे. शहराची रचना पाहता, तीळगंगा नदीवर साखळी पूल आहे, तेथे पर्यायी पूल उभारावा लागणार आहे. (प्रतिनिधी)


मंत्रालय पातळीवर प्रक्रिया सुरू; मात्र आदेश नाहीत
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडे संपर्क साधला असता, त्यांनी सातारा जिल्ह्याच्या अधीक्षक अभियंता कार्यालयापर्यंत अद्याप कसल्याही प्रकारचा आदेश अथवा अद्यादेश आला नसल्याचे सांगितले. मंत्रालयस्तरावर याबाबतची प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत आदेश येण्याची शक्यता असून, तातडीने जुना राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे सांगितले.

महामार्ग पुसेगावातून का बाहेरून?
नागरिकांच्यात संभ्रमावस्था : वाहतुकीचा नेहमीचाच त्रास; रस्त्यामुळे दळणवळण वाढणार
पुसेगाव : सातारा-पंढरपूर या राज्यमार्ग क्रमांक ७४ ला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला असून, चार लेनच्या होणाऱ्या या रस्त्यासाठी शासनाने सुमारे ४५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या महामार्गावर येणारे पुसेगाव या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हा प्रस्तावित रस्ता गावातून की गावाबाहेरून होणार याबाबत नागरिकांच्यात संभ्रमावस्था आहे.
दरम्यान, येथील वाहतुकीचा नेहमीच त्रास होत आहे. तर महामार्गामुळे दळणवळण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
खटाव तालुक्यातील पुसेगाव हे श्री सेवागिरी महाराजांच्या तर माण तालुक्यातील गोंदवले हे गोंदवलेकर महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेले तीर्थक्षेत्र आहे. आजमितीला या दोन्ही गावांत, भागातील नागरिक, आसपासच्या वाड्या-वस्त्यांवरील लोक, शालेय विद्यार्थी, कामानिमित्त येणारा नोकरवर्ग व भाविक यांना या गावात वाढलेल्या वाहतुकीचा दररोज त्रास सहन करावा लागत आहे. पुसेगावात तर रविवारच्या दिवशी छ. शिवाजी चौक ते श्री सेवागिरी महाराजांच्या मंदिरापर्यंतचे सुमारे अर्धा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना कधीकधी तब्बल २ तास वेळ खर्च करावा लागतो. आज या गावात हा रस्ता सुमारे २० फुटाचा आहे; पण वाढती वाहतूक व गावाचा पुढील काळातील विकास पाहता हा रस्ता फारच तोकडा पडत असल्याचा शासनाचा दावा आहे.
त्या अनुशंगाने या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी अनेकदा गावातील अतिक्रमण बाधीत कुटुंबे व व्यावसायिक यांच्या बैठका घेतल्या आहेत. मात्र त्यात काहीही भरीव स्वरूपाचा अद्याप तोडगा निघालेला नाही.
गेल्या ३० वर्षांपासून गावाच्या बाहेरून रस्ता करण्यासंदर्भात चार-पाच वेळा सर्व्हे देखील झाला आहे. पुसेगावच्या पश्चिमेस येरळा नदीच्या पलीकडून उत्तर बाजूने हा रस्ता प्रास्तावित आहे.
करंजाळा शिवारातून शासकीय विद्यानिकेतनच्या मागील बाजूने येऊन हा रस्ता कटगूण माळात सध्याच्या सातारा-पंढरपूर रस्त्याला
मिळणार आहे. त्यामुळे सुमारे ३ किलोमीटरचे अंतर वाढणार आहे. या रस्त्यामुळे गावातील वाहतुकीची कोंडी सुटून या महामार्गावरील रस्त्याची वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Way of a passage to Koregaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.