कुरघोड्यांच्या राजकारणामुळे पाणीबाणी

By Admin | Updated: March 23, 2016 00:18 IST2016-03-22T22:37:20+5:302016-03-23T00:18:55+5:30

वस्त्रनगरीची शोकांतिका : तीन लाख लोकसंख्येला वाली नसल्याची नागरिकांत भावना, वारणा नदीतून योजना लांबणीवर

Waterfall due to turmoil politics | कुरघोड्यांच्या राजकारणामुळे पाणीबाणी

कुरघोड्यांच्या राजकारणामुळे पाणीबाणी

राजाराम पाटील -- इचलकरंजी शहरास पिण्याचे पाणी पुरवणारी पंचगंगा नदी दूषित झाल्याने आणि उन्हाळ्यात नदीतील पाणीपातळी खालावल्यामुळे दोन्ही नद्यांतून शाश्वत पाणी मिळत नाही. तर लोकप्रतिनिधींच्या राजकीय कुरघोड्यांमुळे वारणा नदीतून नळयोजना लांबणीवर पडली. परिणामी, तीन लाख लोकसंख्या असलेल्या इचलकरंजीकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.इचलकरंजीस पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा करणारी नळयोजना स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यान्वित आहे. संस्थानकाळापासून असलेल्या पाणीपुरवठा योजनेमार्फत शहरात ठिकठिकाणी असलेल्या दगडी बांधकामाच्या हौदातून पाणीपुरवठा होत असे. हे पाणी हौदापासून शहरवासीयांना आपापल्या घरी न्यावे लागत होते. स्वातंत्र्योत्तर काळात शहराच्या वाढत्या वस्त्रोद्योगाबरोबर लोकसंख्याही वाढू लागली. त्यामुळे नगरपालिकेच्यावतीने पंचगंगा नदीतूनच पाणीपुरवठा करणारी नवीन योजना कार्यान्वित करण्यात आली. पंचगंगेतून शंभर अश्वशक्तीच्या पंपामार्फत शहरात आणलेले पाणी शुद्ध करून टाक्यांतून नळाद्वारे पुरविले जात असे.
शहराची लोकसंख्या दीड लाखांवर गेल्यामुळे सन १९९२-९३ च्या दरम्यान कृष्णा नदीतून पाणी आणणारी योजना तत्कालीन कॉँग्रेसकडून आखण्यात आली. मात्र, त्यावेळी झालेल्या विरोधामुळे ती रखडली. पुढे हीच योजना सन १९९८-९९ ला कार्यान्वित करण्यात आली. मजरेवाडी (ता. शिरोळ) येथून सुमारे १९ किलोमीटरवरून इचलकरंजीसाठी पाणी आणण्यात आले.
पंचगंगा व कृष्णा या दोन्ही योजनांतून शहरात पाणी पुरविले जात असे. मात्र, जानेवारीनंतर पंचगंगेचे पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित होऊ लागले. म्हणून पंचगंगेचा पाणीपुरवठा खंडित होऊ लागला. परिणामी फक्त कृष्णा योजनेवरच अवलंबून राहावे लागत असल्याने शहरास आठवड्यातून दोनवेळा पाणीपुरवठा होऊ लागला.
पंचगंगेला पर्याय म्हणून सुमारे नऊ वर्षांपूर्वी तत्कालीन सत्तारूढ कॉँग्रेस पक्षाने वारणा नदीतून पाणी आणण्याची योजना आखली. त्यावेळी सुद्धा विरोधकांनी या योजनेला विरोध केला. आमदार सुरेश हाळवणकर यांनी, कोल्हापूरप्रमाणे इचलकरंजीत सुद्धा काळम्मावाडी धरणातून थेट नळाद्वारे पाणी आणण्याची घोषणा केली. सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी सुद्धा त्यांनी काळम्मावाडी योजनेचाच पाढा चालू ठेवला. आता राज्याच्या सत्तेवर
भाजप सरकार असल्याने इचलकरंजीकरांना काळम्मावाडी योजना होणार, अशी आशा होती. मात्र, इचलकरंजी नगरपालिकेस काळम्मावाडी योजना पेलणारी नाही. म्हणून पर्यायी योजना सूचविण्यास शासनाने सांगितले.

आमदारांचा ‘यू टर्न’ आणि वारणा योजना
शासनाने पर्याय सुचविण्यास सांगितल्यानंतर दूधगंगा नदीतून सुळकूड (ता. कागल) येथून पाणी आणण्याची योजना सुचविण्यात आली; पण आता पुन्हा आमदार हाळवणकर यांनी ‘यू टर्न’ घेतला आणि वारणा नदीतून पाणी आणणारी योजना राबविण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. त्याप्रमाणे सरकारच्या अमृत योजनेमध्ये वारणा योजनेचा अंतर्भाव करण्यात आला.


मात्र, यामुळे त्यावेळी ५५ कोटी रुपयास होणारी योजना आता ८१ कोटी रुपयांवर गेली आहे. तर त्यावेळी नगरपालिकेचा हिस्सा अवघ्या दहा टक्के होता. तर आता नगरपालिकेच्या माथी २५ टक्क्यांचा हिस्सा बसणार आहे. म्हणजे इचलकरंजीकरांच्या माथी वीस कोटींचा भुर्दंड बसला आहे.

मात्र, गेल्या सात वर्षांत विरोध झाला नसता तर वारणा योजना कार्यान्वित झाली असती आणि इचलकरंजीकरांना सातत्याने पाणी मिळाले असते. पण राजकीय कुरघोड्या आणि श्रेयवादामुळे इचलकरंजीकरांना आता पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

Web Title: Waterfall due to turmoil politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.