झाडाच्या बुंध्यातून वाहतंय पाणी !
By Admin | Updated: January 3, 2015 00:01 IST2015-01-02T21:07:01+5:302015-01-03T00:01:01+5:30
विद्यानगरमधील प्रकार : झाडाला छिद्र पाडून बसविला नळ

झाडाच्या बुंध्यातून वाहतंय पाणी !
कोपर्डे हवेली : ‘देवाची करणी, नारळात पाणी’ असं म्हटलं जातं. त्यातून निसर्गाचा चमत्कार प्रकट होतो. आता ‘माणसाची करणी आणि झाडाच्या बुंध्यातून नळाचं पाणी’ असं म्हणण्याची वेळ आली आहे. विद्यानगरमध्ये हा प्रकार पाहायला मिळत आहे.
विद्यानगरमध्ये कऱ्हाड-मसूर रस्त्यालगत विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे गाडे व रेस्टॉरंट आहेत. याठिकाणी पदार्थ खाल्ल्यानंतर पाणी पिण्यासाठी ग्राहकांना झाडाचा आधार घ्यावा लागतो. संबंधित झाडात एका व्यावसायिकाने पाणी पुरवठ्याचा नळ बसविला आहे. त्यासाठी त्याने झाडाला पाईपच्या आकाराचे छिद्र पाडले असून, त्या छिद्रातून पाणी पुरवठ्याची पाईप नेली आहे. झाडातून बाहेर काढलेल्या या पाईपला चावी बसविण्यात आली आहे.
त्यामुळे त्याठिकाणी पाणी पिण्यास येणाऱ्यांना झाडातूनच पाणी बाहेर पडत असल्याचा समज होतो. संबंधित झाडाचा घेर सुमारे तीन फूट आहे़ बुंध्यापासून सुमारे चार फूट उंचीवर अर्ध्या इंचाचे छिद्र पाडून नळाची पाईप बसविण्यात आली आहे़ हा प्रकार नवीनच असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह तेथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाकडून त्याची चर्चा होते.
दरम्यान, झाडाच्या बुंध्यातून येणाऱ्या या पाण्याचे आकर्षण असले तरी झाडाला ईजा पोहोचत असल्याने पर्यावरणप्रेमींकडून त्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. शासनाच्या माध्यमातून ‘झाडे लावा झाडे जगवा, असा संदेश देण्यात येत असतो़ त्यासाठी विविध संस्थांमार्फत पावसाळ्यात झाडे लावण्याचा उपक्रमही हाती घेण्यात येतो. मात्र, विद्यानगरमध्ये होत असलेला हा प्रकार झाडासाठी घातक ठरणारा आहे. (वार्ताहर)
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या क्लृप्त्या करतात. त्यामुळे ग्राहक आकर्षितही होतात; पण फक्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी झाडाला इजा पोहोचवून लढविण्यात आलेली ही शक्कल पर्यावरणप्रेमींना मान्य नाही. हा प्रकार बंद करावा, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.