घाडगेवाडीत प्रत्येक उन्हाळ्यात टँकरने पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:38 IST2021-03-20T04:38:27+5:302021-03-20T04:38:27+5:30
आदर्की : घाडगेमळा येथील ग्रामस्थांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. प्रत्येक उन्हाळ्यात प्रथम टँकर सुरू केला जातो. ग्रामस्थांच्या ...

घाडगेवाडीत प्रत्येक उन्हाळ्यात टँकरने पाणी
आदर्की : घाडगेमळा येथील ग्रामस्थांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. प्रत्येक उन्हाळ्यात प्रथम टँकर सुरू केला जातो. ग्रामस्थांच्या व जनावरांच्या पिण्याच्या व वापराच्या पाण्याची गैरसोय मोठ्या प्रमाणावर होत असून शेतीचा विषय भयानक आहे. त्यामुळे घाडगेमळाचा समावेश धोम बलकवडीच्या लाभक्षेत्रात करावा, अशी मागणी फलटण तालुका शिवसेना प्रमुख प्रदीप झणझणे यांनी केली आहे.
शिवसेनेचे फलटण तालुका प्रमुख प्रदीप झणझणे यांनी सातारा येथील कार्यालयात जलसंपदा अधीक्षक मिसाळ यांची घाडगेमळा ग्रामस्थांसह भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली. यावेळी शिवसेनेचे विभागप्रमुख महेंद्र घाडगे, सागर घाडगे, अजय सूळ उपस्थित होते.
धोम बलकवडीच्या लाभक्षेत्रात नाव नसेल तर घाडगेमळा गावास पाणी देता येणार नाही, असे जलसंपदा अधीक्षक मिसाळ यांनी स्पष्ट सांगितले. त्यावर प्रतिक्रिया देताना झणझणे म्हणाले, धोम बलकवडीच्या लाभक्षेत्रात फलटण तालुक्यातील ५१ गावांचा १९९६ मध्ये शिवसेनेच्या सत्ताकाळात समावेश करण्यात आला आहे. आजमितीला ५१ गावे सोडून इतर गावांनाही पाणी पुरवठा कसा केला जातो, या विषयावर माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सातारा जिल्हा जलसंपदा अधीक्षक मिसाळ यांनी सांगितले.
यावेळी प्रदीप झणझणे म्हणाले, फलटण तालुक्यातील गावांना धोम बलकवडीच्या पाण्याचा लाभ वर्षातून फक्त एकदाच मिळतो. धोम बलकवडीच्या पाण्याची केवळ एकच फेरी फलटण तालुक्यात येते. धोम बलकवडीच्या पाण्याचा केवळ राजकारणासाठी वापर केला जात आहे. ज्या गावांची नावे धोम बलकवडीच्या लाभक्षेत्रात नाहीत, तिथे सिमेंटमध्ये पाटपोट काढले आहेत. धोम बलकवडीचे कामकाज निकृष्ट दर्जाचे झाले असून लवकरच त्याच्या चौकशीसाठी जिल्ह्यापासून राज्यापर्यंत पाठपुरावा करणार आहे. ज्या गावांना पाण्याची जास्त आवश्यकता आहे, अशा गावांना प्राधान्य देऊन फलटण तालुक्यातील जास्तीत जास्त गावांना धोम बलकवडीच्या पाण्याचा लाभ द्यावा.