मेढ्यासह सहा गावांचा पाणीपुरवठा बंद
By Admin | Updated: December 4, 2014 23:46 IST2014-12-04T21:59:39+5:302014-12-04T23:46:03+5:30
वीज बिल थकबाकी : साडेसहा लाखांसाठी घरपट्टी वसुली जोरात

मेढ्यासह सहा गावांचा पाणीपुरवठा बंद
मेढा : मेढा शहरासह सहा गावांच्या असलेल्या प्रादेशिक नळ योजनेचे सुमारे सहा लाख पन्नास हजार रुपये वीज बील न भरल्यामुळे गेल्या १० दिवसांपासून मेढा व सहा गावात पाणीपुरवठा बंद असून मेढा ग्रामस्थांच्यात संतापाचे वातवरण निर्माण झाले आहे. साडेसहा लाख रुपये थकबाकी होईपर्यंत वीज वितरण कंपनीवाले थांबले की प्रादेशिक नळ योजना चालवणारे थांबले? याबाबत मात्र जनतेत साशंकता आहे. दरम्यान मेढा ग्रामपंचायत, प्रादेशिक नळ योजना मंडळ व वीज वितरण कंपनी या साऱ्यांनीच ‘तु-तु, मै-मै’ अशी भूमिका घेतल्यामुळे नक्कीच कोठे तरी पाणी मुरत असल्याची शंका व्यक्त होत
आहे.
मेढा शहरासह ८ गावांच्या असलेल्या प्रादेशिक नळ योजनैपैकी २ गावांनी स्वतंत्र व्यवस्था केल्यामुळे आता ६ गावांसाठी ही योजना चालू आहे. १९९१ पासून मेढा शहर व इतर गावांना प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेमार्फत पाणी पुरवठा होत आहे. तर २००९ पासून ही योजना पाणी पुरवठा विभागाऐवजी ६ गावांच्या नळ पाणी पुरवठा कमिटीकडे वर्ग करण्यात आली. मात्र १९९९ ते २०१४ या गेल्या १५ वर्षात ही योजना कधीच सुरळीत चालली नाही. त्यामुळे जनतेसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरवर्षी या योजनेवर लाखो रुपये खर्च होतात, मात्र मेढेकरांना पाणी योजनेच्या गलथान नियोजनाचा दरवर्षी फटका बसत आहे. योजनेच्या दोन मोटारी एकाचवेळी बंद पडल्यामुळे सांगली येथे दुरूस्तीसाठी नेण्यात आल्या होत्या. त्यावेळीही सुमारे ८ दिवस नळांना पाणी नव्हते. परिणामी ग्रामस्थांना अनेक अडजणींना तोंड द्वारे लागले. मेढा शहराला दररोज सुमारे ४ लाख लिटर पाणी लागते. या पाण्यासाठी दररोज सुमारे हजारी ६ रु प्रमाणे २४०० प्रमाणे वाषिर्क साडेसात ते ८ लाख रुपये पाणीपट्टी भरावी लागते.
मेढा ग्रामपंचायतीकडून चालू आर्थिक वर्षात दरमहा रु ५० हजार प्रमाणे नोव्हेंबर २०१४ अखेर पाणी पट्टी प्रादेशिक नळ योजनेकडे जमा केल्याची माहिती मेढ्याचे ग्रामविकास अधिकारी संजय पालवे यांनी दिली. तर गेल्या आर्थिक वर्षातील सुमारे साडेतीन लाख रुपये मेढा ग्रामपंचायतीकडून येणे असल्याचे प्रादेशिक नळ योजना कमिटीचे चंद्रकांत देशमुख यांनी दिली तर वीज कंपनीचे अधिकारी घोरपडे यांनी योजनेची साडेसहा लाख थकबाकी असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
सर्वांचीच बोटे एकमेकांकडे
मेढ्यासह इतर गावांकडून वेळच्या वेळी पाणी पट्टी प्रादेशिक नळ योजना कमिटीचे जमा होत असल्यास वीज वितरण कंपनीचे वीज बील थकले कसे? याचबरोबर सर्व सामान्य नागरिकांनी एका महिन्याचे वीज बील न भरल्यास वीज तोडण्याची कारवाई करणारे वीज तंडळ साडेसहा लाख रुपये थकबाकी होईपर्यंत थांबले कसे? अशी शंका उपस्थित होत असून मेढा ग्रामपंचायत ही प्रादेशिक पाणी योजनेकडे तर प्रादेशिक पाणी योजना कमिटीचे अध्यक्ष वीज वितरण कंपनीकडे बोट दाखवत असल्यामुळे यामध्ये नक्कीच कोठेतरी पाणी मुरत असल्याची शंका व्यक्त होत आहे.
वीज बिलाची थकित रक्कम लवकरात लवकर भरून पाणी सुरू करण्यात येईल.
- चंद्रकांत देशमुख,
अध्यक्ष प्रादेशिक नळ योजना समिती
मेढा ग्रामपंचायतीने घरपट्टी, पाणीपट्टी मोहिम सुरू केली असून नागरीकांनी सहकार्य करावे
- संजय पालवे,
ग्रामविकास अधिकारी मेढा५