पावसाच्या जिल्ह्यात विकतच पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:37 IST2021-03-21T04:37:43+5:302021-03-21T04:37:43+5:30
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात दरवर्षी धो-धो पाऊस पडतो. त्यामुळे जिल्ह्यातील धरण, तलाव फेब्रुवारी, मार्चपर्यंत भरलेले असतात. तरीही सातारकरांवर अनेकदा ...

पावसाच्या जिल्ह्यात विकतच पाणी
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात दरवर्षी धो-धो पाऊस पडतो. त्यामुळे जिल्ह्यातील धरण, तलाव फेब्रुवारी, मार्चपर्यंत भरलेले असतात. तरीही सातारकरांवर अनेकदा पिण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ येते. मार्च महिना सुरू झाला की, पुढील दोन महिने पालिकेकडून पाणी कपात केली जाते. याच काळात लग्नसमारंभ, वास्तुशांतीसारखे समारंभ असतात, तेव्हा पै पाहुण्यांना थंडगार पाणी मिळावे म्हणून जार विकत घेण्याचे जणू ‘फॅड’ आले आहे.
पालिकेकडून दर आठवड्याला पाणी कपात केली जाते, त्यामुळे अनेक नागरिक हे जार पिण्यासाठी घेतात. त्याचप्रमाणे मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये दर दोन दिवसांनी पाच, दहा हजार लीटर क्षमतेचे टँकर मागवावे लागतात. माण, खटाव तालुक्यांच्या तर दुष्काळ पाचवीलाच पुजलेला आहे, असं म्हटलं जायचं. पण गेल्या काही वर्षांमध्ये या तालुक्यांमध्ये वाॅटर कप अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. त्यातच गेल्यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे सर्व भांडी भरलेली आहेत. त्यामुळे माण तालुक्यात अजून तरी टँकर सुरू झालेला नाही. ही एकीकडे जमेची बाजू असली, तरी सातारा शहरात अजूनही विकत पाणी घ्यावे लागते, हे दुर्दैव म्हणावे लागेल.
चौकट...
सहली अन् कार्यालयात
जिल्ह्यात कास, बामणोली, महाबळेश्वर, तापोळा यासारखी असंख्य पर्यटनस्थळे आहेत. याठिकाणी अनेकांच्या कौटुंबिक सहली जात असतात. तेव्हा पिण्याची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून आपल्या गाडीमध्ये थंडगार पाण्याचा जार घेऊन ते सहलीला जात असतात. त्याचप्रमाणे शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयांमध्ये शुद्ध पाण्याची सोय केलेली असली तरी आपत्कालिन परिस्थितीत जार सोयीचा वाटत आहे.
- जगदीश कोष्टी
फोटो
प्रुफ/२०कुलिंग वॉटर जार
प्रुफ/२०वॉटर टँकर.पीएनजी