खंडाळा शहरात पाणीटंचाईचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:41 IST2021-04-01T04:41:02+5:302021-04-01T04:41:02+5:30
खंडाळा : खंडाळा तालुक्यात उन्हाळा सुरू होताच, भूजल पातळी कमी होत चालली आहे. खंडाळा शहरात गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाईचे संकट ...

खंडाळा शहरात पाणीटंचाईचा विळखा
खंडाळा : खंडाळा तालुक्यात उन्हाळा सुरू होताच, भूजल पातळी कमी होत चालली आहे. खंडाळा शहरात गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसभराच्या पाण्यासाठी चणचण भासत आहे. शहरातील लोकांना गरजेपुरते पाणी मिळावे, यासाठी आटापिटा करावा लागत आहे.
नागरिकांच्या या समस्येला शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगरपंचायतीत निवेदन देऊन वाचा फोडली. शहरात पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे खंडाळ्यातही पाणीटंचाईचा विळखा पडू लागला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, खंडाळा शहरातील पाणीपुरवठा सद्य:स्थितीत नियोजनशून्य आणि नगरपंचायत प्रशासन यांच्या उदासीनतेमुळे नागरिकांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपूर्वी जुनी झालेली पाण्याची टाकी पाडण्यात आली. त्यापूर्वी शहरातील त्या टाकीद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या भागातील पाण्याचे नियोजन अपेक्षित होते. त्यानंतर, कालावधी उलटून गेला, तरी नवीन पाण्याची टाकी नियोजित नाही किंवा तसा प्रस्तावही करण्यात आलेला नाही. त्यामुळे काही भागांत पाणीपुरवठा कमी दाबाने तर काही ठिकाणी पाणी नळाला येतच नाही, तसेच शहरात चालू असलेल्या रस्ते व इतर कामामुळे पाइपलाइनचे नुकसान व मोडतोड होत असते, त्यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन होत नाही. याबाबत तातडीने उपाययोजना होणे अपेक्षित आहे. पाइपलाइनच्या लिकेजमुळे रस्त्यावर पाणी वाया जात आहे. अशामुळे शहरात काही ठिकाणी बकालपणा येत आहे. नागरिकांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मानवनिर्मित पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पाडलेल्या टाकीला पर्यायी नवीन पाण्याची टाकी उभारण्याचा निर्णय व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
नगरसेवक दयानंद खंडागळे, नगरसेविका सुप्रिया गुरव, उज्ज्वला संकपाळ, सुप्रिया वळकुंदे, भरत गाढवे, प्रशांत देशमुख, अमोल गाढवे, सागर गुरव, प्रवीण संकपाळ, केतन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी हे निवेदन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ.योगेश डोके यांच्याकडे देण्यात आले आहे.