पाणी टंचाईमुळं नवरी मिळेना नवऱ्याला !
By Admin | Updated: April 18, 2015 00:08 IST2015-04-17T23:03:02+5:302015-04-18T00:08:37+5:30
जंगलवाडीत इच्छुक वरांची पाण्यासाठी वरात : पाळीव जनावरेही पै-पाहुण्यांकडे सोडली

पाणी टंचाईमुळं नवरी मिळेना नवऱ्याला !
चाफळ : साखरवाडी ते जंगलवाडी दरम्यानच्या पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम संबंधित ठेकेदाराच्या वेळकाढूपणामुळे रखडले आहे. परिणामी, ऐन उन्हाळ्यात जंगलवाडी ग्रामस्थांना डोंगरातून दोन किलोमीटरची पायपीट करत पाणी आणावे लागत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तहान भागत नसल्याने अनेकांनी आपली पाळीव जनावरे दुसऱ्या गावास पै-पाहुण्यांच्याकडे पाठवून दिली आहेत. गावाला वर्षोनुवर्ष पाणी टंचाईस सामोरे जावे लागत असल्याने या गावातील तरुणांना विवाहासाठी कोणी मुलगी देण्यास तयार होत नाही.सध्या गावामध्ये एक कूपनलिका व एक पाण्याची जुनी विहीर आहे. संबंधित विहीर पूर्णपणे कोरडी पडली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्रित येऊन दोन किलोमीटर अंतरावर एका पाण्याच्या झऱ्याजवळ एक गोल तळे खोदले आहे. त्याठिकाणी एका कुटुंबास फक्त दोनच घागरी पाणी मिळते. दोन घागरीवरच प्रत्येक कुटुंबाला समाधान मानावे लागते. ही येथील सत्यपरिस्थिती आहे. हे दोन घागरी पाणी मिळवण्यासही ग्रामस्थ, महिलांना रात्रंदिवस रांगा लावून दोन किलोमीटरची पायपीट करीत पाणी आणावे लागत आहे. या पाण्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होत असली तरी जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर कपडे धुण्यासाठी येथील महिला डोंगर पालथा घालून पायपीट करीत गमेवाडी येथील उत्तरमांड धरणावर येतात.
जंगलवाडीच्या नशिबी असणारा पाण्याचा वनवास संपत नसल्याने या गावात मुलगी देण्यासही कोणी तयार होत नाही. गावाचे नाव ऐकुन आणि तेथील एकूण परिस्थिती पाहूनच ‘आमची मुलगी या गावात द्यायची नाही’ असे पालक सांगू लागले आहेत. त्यामुळे अनेक तरुणांचे विवाह रखडले आहेत.
रस्ता नाही, पाणी नाही, त्यामुळे हे गाव विकास कामांपासून वंचित राहत आहे. रखडलेल्या पाणी योजनेच्या पाईपलाईनचे काम तातडीने पूर्ण झाल्यास या गावाची पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. यासाठी कऱ्हाड व पाटण तालुक्यांतील लोकप्रतिनिधिंनी गावातील हा जिव्हाळ्याचा विषयासाठी प्रामाणिक व सामूहिक प्रयत्न करण्याची माफक अपेक्षा येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. (वार्ताहर)
चोरे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. साखरवाडी ते जंगलवाडी दरम्यानच्या पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करून येत्या पाच-सहा दिवसांत जंगलवाडी गावास पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या योजनेमुळे जंगलवाडी गावाचा पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.
- बाळासाहेब साळुंखे, चोरे
दरवर्षी जनावरांची ससेहोलपट
जंगलवाडी ग्रामस्थ पाण्यासाठी झगडत आहेत; पण अशात पाळीव जनावरांचे अतोनात हाल होताना दिसतात. वेळेवर पाणी न मिळाल्याने जनावरे पाण्यासाठी टाहो फोडतात. हे दृष्य ग्रामस्थांचे हृदय पिळवटून टाकते. काही ग्रामस्थांनी या परिस्थितीला कंटाळून आपली जनावरे पाहुण्यांकडे ठेवली आहेत. उन्हाळा संपेपर्यंत ही जनावरे पाहुण्यांकडे ठेवायची व पावसाळ्याच्या सुरुवातीला ती परत घेऊन यायची, असे येथील ग्रामस्थांना दरवर्षी करावे लागते.
मुळातच जंगलवाडी गावाची विभागणी दोन तालुक्यांत आहे. गावातील पाण्याचे स्त्रोत खालावल्याने दरवर्षी ग्रामस्थांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी टंचाईमुळे आमच्या गावातील मुलांना लग्नासाठी कोणी मुलगी देण्यास तयार होत नाही. जंगलवाडीस रस्ता नाही, पिण्याचे पाणी नाही, त्यामुळे अनेकांनी आपली जनावरे पाहुण्याकंडे पाठविली आहेत.
- नामदेव माने, ग्रामस्थ, जंगलवाडी