पाणी नदीला; पण कोरड पिकाला

By Admin | Updated: November 13, 2015 23:44 IST2015-11-13T21:44:06+5:302015-11-13T23:44:01+5:30

काढणे परिसरातील स्थिती : कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी हतबल

Water to the river; But dry crop | पाणी नदीला; पण कोरड पिकाला

पाणी नदीला; पण कोरड पिकाला

कुसूर : पाटण तालुक्यातील काढणे परिसरात शेतीपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. परिणामी शेतीपंप सुरू होत नाहीत. याबाबत शेतकऱ्यांनी वीज कंपनीकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत असून, पाणी असूनही विजेअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची चिन्हे आहेत.
काढणे येथील वांग नदीवरील पुलाशेजारी तळमावले वीज उपकेंद्राअंतर्गत वीजपुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर आहे. येथून २५ ते ३० शेतकऱ्यांच्या शेती पंपांना वीजपुरवठा करण्यात आला आहे. मात्र गत महिन्यापासून पंपांना सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने पंप सुरू होत नाहीत. एखादा पंप सुरू झालाच तर काही वेळात प्रमाणापेक्षा जास्त गरम होऊन बंद पडत आहेत. अशातच वीजपुरवठा कमी जास्त झाल्याने पंपात बिघाड निर्माण होत आहे.
वांग नदीवर काढणे येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा असल्याने बंधाऱ्यातील उपलब्ध पाणीसाठ्यावर रब्बी हंगामातील शाळू, गहू, हरभरा, करडई आदी पिकांसह बागायती पिके मोठ्या प्रमाणात शेतकरी घेतात. रब्बी हंगाम पूर्व गहू, हरभरा, शाळू पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत.
मात्र जमिनीमध्ये पुरेशी ओल नसल्याने या पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. सध्या नदीपात्रात पाणीसाठा समाधानकारक असतानाही विजेअभावी या पिकांना शेतकऱ्यांना वेळेत पाणी देता येत नाही. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले जाण्याची भीती व्यक्त होत आहे. वीजवितरणने या परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Water to the river; But dry crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.