विद्यानगर रस्त्यावरील पाणीप्रश्नी बेमुदत उपोषणाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:27 IST2021-06-05T04:27:58+5:302021-06-05T04:27:58+5:30
प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, गजानन हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी ...

विद्यानगर रस्त्यावरील पाणीप्रश्नी बेमुदत उपोषणाचा इशारा
प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, गजानन हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, सर्जेराव पानवळ, सैदापूरचे मंडल अधिकारी विनायक पाटील, ग्रामविकास अधिकारी निंबाळकर, एन. व्ही. चिंचकर उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, ‘विद्यानगर येथील राष्ट्रीय महामार्गावर दर वर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद होत आहे. या परिसरातील रहिवाशांच्या घरात पाणी शिरत आहे. घरांच्या सभोवती अनेक दिवस पाणी साचून राहत असल्याने घरांनाही धोका निर्माण झाला आहे. नवीन कृष्णा पुलाच्या जोडरस्त्याचे काम करताना पुलाच्या दोन्ही बाजूला असलेले चढउतार काढून सरळ रस्ता करावा.’
प्रशांत यादव म्हणाले, ‘विद्यानगर येथील रस्त्यावरील पाण्याचा निचरा करावा, यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे. रस्त्याच्या दुतर्फा गटर करण्याच्या सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या आहेत. मात्र काही ठिकाणी अतिक्रमणे असल्याने महसूल विभागाने अतिक्रमणे काढून द्यावीत, असे राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे सांगण्यात येत आहे. तर महसूल विभाग मोजणी विभागाकडे बोट दाखवत आहे. त्यामुळे प्रशासनाने येत्या दहा दिवसांत पाण्याचा निचरा करण्याबाबत कार्यवाही केली नाही, तर १५ जूनपासून सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व कार्यकर्ते बेमुदत उपोषण करतील, असा इशारा प्रशांत यादव यांनी दिला आहे. याबरोबरच अनेक दिवसांपासून रस्त्याचे काम रखडले आहे. तेही काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.