गॅस क्लोरिनेशन प्रणालीद्वारे पाणी
By Admin | Updated: April 7, 2016 23:51 IST2016-04-07T22:39:23+5:302016-04-07T23:51:42+5:30
किरणराज यादव : ‘नगरोत्थान’मधून पाण्यासाठी ६५ लाखांचा निधी

गॅस क्लोरिनेशन प्रणालीद्वारे पाणी
कोरेगाव : ‘नगरविकास विभागाच्या अत्यंत महत्त्वाच्या नगरोत्थान योजनेद्वारे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी नवनिर्मित कोरेगाव नगरपंचायतीसाठी ६५ लाखांचा निधी पाणी योजना विस्तारीकरण व बळकटीकरणासाठी मंजूर केला आहे. या निधीतून जुनी पाणी शुद्धीकरण यंत्रणेऐवजी नवीन आधुनिक गॅस क्लोरिनेशन प्रणाली बसविली जाणार आहे,’ अशी माहिती प्रशासक किरणराज यादव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्य सरकारने कोरेगावात नगरपंचायत स्थापनेनंतर अवघ्या १९ दिवसांतच शहरातील पाणी योजनांचा आढावा घेतला होता. पाणी योजनांची यंत्रणा जुनी असल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता विनय कुलकर्णी यांच्यासह अभियंत्यांच्या टीमने पाणी योजनांची अत्यंत बारकाईने पाहणी करून नगरोत्थान योजनेतून पाणी योजना विस्तारीकरण व बळकटीकरणासाठी सुमारे एक कोटीचे अंदाजपत्रक तयार करून जिल्हाधिकारी मुदगल यांना सादर केले होते. मार्च अखेरीस जिल्हाधिकाऱ्यांनी ६५ लाखांचा निधी मंजूर केला आहे.
पाणी शुद्धीकरणासाठी जुन्या टी.सी.एल. प्रणालीला मूठमाती देऊन नव्याने मंजूर झालेल्या निधीद्वारे आधुनिक गॅस क्लोरिनेशन प्रणाली बसविली जाणार आहे. वसना-वांगणा नद्यांच्या संगमावरील जॅकवेल, पंपिंग स्टेशन, कठापूर योजनेतील मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती, आरफळ कॉलनी ई. एस. आर. साठी नवीन जलवाहिनी, एअर व्हॉल्व्ह दुरुस्ती केली जाणार आहे.
पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार शशिकांत शिंदे व जिल्हा नियोजन अधिकारी हणमंतराव माळी यांनी परिश्रम घेतल्याने कमीत कमी कालावधीत निधी मंजूर झाला असून, कामाला तातडीने सुरुवात केली जाणार असल्याचे यादव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मलकापूर पाठोपाठ कोरेगावात प्रकल्प...
नगरपंचायत स्थापनेनंतर महिना संपण्यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने मुबलक निधी उपलब्ध करून दिल्याने विकासकामांना आता सुरुवात होणार आहे. पाणी शुद्धीकरणाबाबत प्रशासनाने पुढाकार घेतला असून, जिल्ह्यात केवळ मलकापूर (कऱ्हाड) येथेच आधुनिक गॅस क्लोरिनेशन प्रणाली कार्यान्वित आहे. मलकापूर पाठोपाठ आता कोरेगावात ही यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याने जनतेला शुद्ध पाणी मिळणार आहे.
दलित वस्ती सुधारण्यासाठी २५ लाखांचा निधी...
शहरातील दलित वस्ती सुधारण्यासाठी स्वतंत्रपणे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी २५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून रस्ते, गटार्स, जलवाहिनी व इतर विकासकामे केली जाणार आहेत, असे यादव यांनी सांगितले.