कोयना धरणाच्या दरवाजाला टेकले पाणी
By Admin | Updated: August 1, 2014 23:22 IST2014-08-01T22:20:10+5:302014-08-01T23:22:10+5:30
७१ टीएमसी पाणी : तारळी, कण्हेर, बलकवडी, वीर, उरमोडीतून विसर्ग

कोयना धरणाच्या दरवाजाला टेकले पाणी
पाटण : सातारा जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली असली तरी कोयना धरण पोणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणात ७१.८५ टीएमसी पाणीसाठा झाला असून, धरणाच्या दरवाजांना पाणी टेकले आहे.
कोयना धरणातील पाणीपातळी २१३२ फूट झाली आहे. त्यामुळे धरणाच्या भिंतीतील सहा वक्री दरवाजांना पाणी टेकले आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता झालेल्या चोवीस तासांत कोयना येथे १३२, नवजा येथे १८५ तर महाबळेश्वरमध्ये १४५ मिलीमीटर पाऊस पडला. कोयना धरण भरण्यासाठी आणखी ३४ टीएमसी पाण्याची गरज आहे. शुक्रवारी पावसाचा जोर मंदावला असला तरी धरणात ७१,७०८ क्युसेक पाणी येत आहे. १ जूनपासून कोयना येथे ३,१५३, नवजा येथे ३,७४८, तर महाबळेश्वरमध्ये २,९६३ मिलीमीटर पाऊस पडला आहे. संगमनगर धक्का पुलाचे पाणी कमी झाले असल्याने पुलापलीकडील ३५ गावे संपर्कात आली आहेत.
कोयनेत ८५ टीएमसी पाणीसाठा झाला की धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन केले जाते. त्यानंतर कधी व किती पाणी धरणाच्या दरवाजातून सोडायचे हे ठरविले जाते. सातारा शहरातही गेल्या चार दिवसांत मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. मात्र, शुक्रवारी काही काळ विश्रांती घेतली. त्यामुळे अनेक दिवसांपासून रखडलेली कामे सातारकरांनी पूर्ण केली. सततच्या पावसामुळे शेतीचे काम भर पावसात सुरू होती. आज उघडीप दिल्याने गवत व पिके उगवण्यास मदत होणार आहे. त्यामुळे चाराचा प्रश्न सुटणार आहे. (प्रतिनिधी)