ओढाजोड प्रकल्पाने खळाळले पाणी.!
By Admin | Updated: August 12, 2016 00:06 IST2016-08-12T00:05:23+5:302016-08-12T00:06:11+5:30
चांदक-गुळुंब : आगळा वेगळा रोल मॉडेल ठरला वरदायिनी; पिण्याच्या पाण्याचा साठा वाढणार, ग्रामस्थांमध्ये आनंद

ओढाजोड प्रकल्पाने खळाळले पाणी.!
सातारा : वाईमधील चांदक-गुळुंब हा ओढाजोड प्रकल्प देशातील आगळा-वेगळा रोल मॉडेल ठरला आहे. सध्या झालेल्या पावसाने या ओढाजोडने गुळुंबचा पाझर तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे. हा तलाव भरून सध्या वाहतोय. या प्रकल्पाने गुळुंब ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील पाण्याच्या चिंतेच्या जागी आनंद फुलविला आहे.
राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे अध्यक्ष एस. रामादुराई यांनी मे २०१५ मध्ये चांदक-गुळुंब ओढाजोड प्रकल्पाला अचानक भेट देऊन प्रशासनाच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली होती. या प्रकल्पाची माहिती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
चांदक येथील ओढा पावसाळ्यामध्ये पूर्ण क्षमतेने भरून वाहतो. या ओढ्यावर चार ठिकाणी बांध आहेत की जे पूर्ण क्षमतेने भरून वाहतात. या उलट गुळुंबमध्ये पडणाऱ्या कमी पावसामुळे पाणीटंचाई भासते. पाझर तलावांखाली असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या ३ तसेच कृषी क्षेत्रासाठी २८ विहिरींना फायदा होणार आहे. या ओढाजोड प्रकल्पामुळे १ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली, १० लाख ८० हजार वार्षिक टँकरवर होणारा खर्च पूर्णपणे थांबणार, चांदक आणि गुळुंब या दोन्ही गावांतील ५ हजार लोकांच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे. हे जलयुक्त शिवार अभियानाचे यश आहे. चांदक-गुळुंब ओढाजोड प्रकल्पाने पाण्याबरोबरच ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर हा आनंद ओव्हरफुल्ल केला आहे. हेच या प्रकल्पाचे रोल मॉडेल म्हणावे लागेल. (प्रतिनिधी)
अधिकारी व ग्रामस्थ बोलले भरभरून !