दोन सोसायट्यांना २५ वर्षांनंतर आले पाणी!
By Admin | Updated: May 24, 2016 00:48 IST2016-05-23T21:41:29+5:302016-05-24T00:48:54+5:30
महाबळेश्वर पालिका : दूषित पाण्यावर उपाय एकदाचा शोधला; नैसर्गिक झऱ्यावरील अवलंबित्व संपुष्टात

दोन सोसायट्यांना २५ वर्षांनंतर आले पाणी!
महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील मुन्नवर हौसिंग सोसायटी व जिजामाता हौसिंग सोसायटीमध्ये नगरसेवक कुमार शिंदे यांच्या अथक प्रयत्नामुळे या दोन्ही सोसायटीमध्ये तब्बल २५ वर्षांनंतर महाबळेश्वर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजना चालू करण्यात यश आले. यावेळी पाणी सोसायटीमध्ये आल्यानंतर कुमार शिंदे यांच्याकडून पाण्याची पूजा करून नारळ वाढविण्यात आला. अखेर कुमार शिंदे यांनी दोन्ही सोसायटीमध्ये जलक्रांती घडवून आणली, असे शब्द स्थानिक युवकांच्या तोंडून येऊ लागले व स्थानिक महिला वर्गाने आमदार मकरंद पाटील, नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल, नगरसेवक कुमार शिंदे व इतर नगरसेवकांना आणि मुख्यधिकारी सचिन पवार व पाणीपुरवठा विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले. या दरम्यान सोसायटीचे अध्यक्ष ख्वाजाभाई वारुणकर, तोफिक पटवेकर, माजी नगरसेवक दयानंद सपकाळ, सरदार शेख व सोसायटीमधील सभासद व पाणी पुरवठा कर्मचारी उपस्थित होते. दोन्ही सोसायटीमधील महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या दोन्ही सोसायटीमध्ये सुमारे २५० ते ३०० घरांची वस्ती आहे व येथील लोकसंख्या नऊशे ते एकहजार आहे. मुन्नवार हौसिंग सोसायटीमध्ये दोन विहीर आहेत तर जिजामाता हौसिंगमध्ये एक जीवंत झरा आहे. एप्रिल व मे महिन्यात विहिरींची पातळी खाली गेली असल्यामुळे पाण्याची कमतरता भासत होती, तर जिजामाता मधील झऱ्याचे पाणी दूषित झाले असल्यामुळे पाणी पिण्यासाठी वापरत नाही.
या पाण्यामुळे अनेक जणांना आजारपणाला सामोरे जावे लागले. अशातच दोन्ही सोसायटीला डांबरी रस्ता नसल्यामुळे पाण्याचा टॅकर येत नाही. यावेळी महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असे, अशा अनेक पाण्याबाबत समस्या या दोन्ही सोसायटीमध्ये निर्माण होत आहेत; परंतु नगरसेवक कुमार शिंदे यांनी आमदार मकरंद पाटील यांना या विषयाबाबत माहिती दिल्यानंतर आ. पाटील यांनी या विभागासाठी लागणाऱ्या पाईपलाईन बाबत जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाईप लवकरात लवकर उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल यांनी या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन पालिकेच्या बैठकीत पाण्याबाबतचा विषय घेऊन लगेचच टेंडर काढण्यात आले व हे काम ठेकेदारास देऊन कामाचे उद्घाटन आमदार मकंरद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर वेळो वेळी कुमार शिंदे यांनी महाबळेश्वर वनविभागाकडून येणाऱ्या अडचणींना अनेक वेळा पालिकेमधून पत्र व्यवहार करून वनविभागाच्या हद्दीमधून पाईपलाईन टाकून घेण्यास मंजुरी घेण्यात आली. (प्रतिनिधी)
पाण्याचा वनवास सुटल्याने आनंदोत्सव
तब्बल तीन ते चार महिन्यांनंतर हे काम पूर्ण झाले व दोन्ही सोसायटीमधील सर्व सभासदांना पालिकेतून नळकनेक्शन अर्ज भरण्यात आले व अखेर २२ मे रोजी या दोन्ही सोसायटीचा २५ वर्षांनंतर पाण्याचा वनवास सुटला पाणी जसे सोसायटीत चालू झाले तसे महिलांनी कुमार शिंदे यांचे कौतुक केले व दोन्ही सोसायटीमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला व यावेळी कुमार शिंदे यांनी पाणी प्रश्नाप्रमाणेच रस्त्याचे काम देखील अंतिम टप्प्यात असून, लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले.