ओसाड डोंगरावरच्या रोपांना मिळतंय बाटलीतून पाणी
By Admin | Updated: May 8, 2015 00:18 IST2015-05-07T23:08:00+5:302015-05-08T00:18:20+5:30
शाहूपुरी विद्यालयाचा उपक्रम : ऐन उन्हाळ्यात विद्यालय करतेय रोपांचे जतन

ओसाड डोंगरावरच्या रोपांना मिळतंय बाटलीतून पाणी
सातारा : राष्ट्रीय एकात्मता विकास कार्यसंघ शाहूपुरी संचलित शाहूपुरी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व सेवकांनी दोन वर्षांपूर्वीपासून भैरोबा डोंगर पाण्याच्या टाकी परिसरात लावलेली १००० झाडे या रणरणत्या उन्हातही जगविण्याचा प्रामाणिक प्रयत्न चालू ठेवला आहे.श्री भैरवनाथ डोंगर परिसराचा उत्तर दिशेकडील जागेत चांगदेव बागल यांनी दिलेल्या दाखलप्राप्त झालेल्या २००० झाडांमधून चिंच, कडुलिंब, पेरू, सीताफळ, आपटा अशा प्रकारातील ७५० झाडांचे वृक्षारोपण विद्यार्थ्यांनी श्री भैरवनाथ वनराई प्रकल्पांतर्गत केले असून, त्यातील २५० झाडे श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात व उर्वरित १००० विद्यार्थ्यांच्या शेतावरती, घराजवळील मोकळ्या जागेत जतन करण्यासाठी दिली आहेत. तसेच या वर्षीही सामाजिक वनीकरण विभागांमार्फत या कामाची दखल घेऊन श्री भैरोबा पाण्याची टाकी परिसरात आॅक्सिजन पार्क निर्मितीसाठी २५० लिंब या वृक्षाची लागवड केली आहे.
मागील वर्षीपासून पावसाळा सोडून उन्हाळ्यापर्यंतच्या कालावधीत गरजेनुसार महिन्यातून एकदा दोनदा विद्यार्थ्यांच्या मार्फत झाडांना सातत्याने बाटलीतून पाणी दिले जात आहे. तसेच उन्हाळ्यात सुरुवातीस आठवड्यातून दोनदा तर नंतर-नंतर प्रत्येक दिवशी विद्यार्थी व शिक्षकांसहित संस्थेच्या कार्यकर्त्यांबरोबर सर्वजण बाटली व कॅनद्वारे पाणी खालून वर नेऊन घालतात. उन्हाळ्यात वणव्यापासून झाडांचे संरक्षण व्हावे म्हणून या प्रकल्पाचे समन्वयक नवनाथ कांबळे, मधुकर जाधव स्वत: शालाप्रमुख क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व इतर सेवकांच्या मदतीने झाडाभोवतीचे गवत काढून, वनखात्याच्या मार्गदर्शनानुसार जाळपट्टीही काढतात.
त्यामुळे झाडापर्यंत वणव्याची आग न जाता झाडांचे संरक्षण होते. या उपक्रमात श्री भैरवनाथ मंदिर येथे येणाऱ्या काही ज्येष्ठ नागरिकांचीही मोलाची मदत होते. तेसुद्धा झाडांना पाणी घालणे, झाडाभोवती सावली करता पोती लावणे ही कामे करून मुलांचा उत्साह वाढविण्याचे काम या वयातही करतात ही बाब आमच्याकरिता खूप आधारमय बनली आहे. श्री भैरवनाथ वनराई प्रकल्पाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणार नाही, याचीही दक्षता घेत झाडाबरोबर लहानांच्या भावनाही होरपळणार नाहीत याची दक्षता घ्यावी. त्याठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी आपल्या बरोबर एक छोटी पाण्याची बाटली आणून एक-एक झाड दत्तक घेतल्यास ही वनराई फुलून शाहूपुरीच्या वैभवात नक्कीच भर पडेल, असा विश्वास भारत भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)