सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कोयना खोऱ्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. तरीही धरणात पाणी आवक असल्याने पाणीसाठा ७२ टीएमसी झाला आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजाला आता पाणी लागण्यास सुरूवात होणार असल्याने पावसाचा जोर वाढल्यास विसर्गही करावा लागणार आहे. सध्या पायथा वीजगृहातूनच २ हजार १०० क्यूसेक विसर्गच सुरू आहे.जून महिन्याच्या मध्यावर जिल्ह्यात पाऊस सुरू झाला. त्यानंतर मागील तीन आठवड्यांहून अधिक काळ पश्चिम भागाला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. तसेच पश्चिम भागातील प्रमुख धरणक्षेत्रातही पावसाची संततधार होती. यामुळे लवकरच धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. सध्यस्थितीत प्रमुख सहा धरणांत ५० ते ७५ टक्क्यांदरम्यान म्हणजे १०३ टीएमसी साठा निर्माण झाला आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाला असलातरी धरणांत पाण्याची आवक होतच आहे. त्यामुळे धरणांची पाणीपातळीही वाढत चालली आहे.
गुरूवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ४१, नवजा आणि महाबळेश्वरला प्रत्येकी ३६ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगर येथे २ हजार १४७, नवजा १ हजार ९२७ आणि महाबळेश्वरला १ हजार ९९७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी असलातरी आवक कायम आहे.गुरूवारी सकाळच्या सुमारास धरणात ११ हजार ५३१ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ७१.९२ टीएमसी झालेला. त्यामुळे आता धरणातील पाणी दरवाजाला स्पर्श करणार आहे. कारण, ७३ टीएमसीला कोयनेतील पाणी दरवाजाला लागण्यास सुरूवात होते. परिणामी पावसाचा जोर वाढल्यास धरणातून लवकरच विसर्ग करावा लागणार आहे.
सातारा शहरात रिमझिम..जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप कायम आहे. तर पश्चिम भागात जोर कमी झालेला आहे. सातारा शहरातही दोन दिवसांपासून रिमझिम सुरू झालेली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण तयार होत आहे. तसेच काहीवेळा सूर्यदर्शनही घडते. यामुळे अनेक दिवसानंतर सातारकर नागरिकांना पावसापासून दिलासा मिळालेला आहे.