महसूल विभाग ठेवणार आता रात्री वॉच
By Admin | Updated: October 8, 2015 01:08 IST2015-10-07T22:03:28+5:302015-10-08T01:08:19+5:30
चार पथकांची नियुक्ती : वाळू, मुरुमाच्या चोरट्या वाहतुकीला लगाम

महसूल विभाग ठेवणार आता रात्री वॉच
कऱ्हाड : तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी वाळू साठे हे अनधिकृतपणे सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यावर कारवाई करत त्यांचे पंचनामे करण्यात आले होते. त्याबाबत विशेष खबरदारी घेण्यासाठी महसूल विभागाकडून पथकांची स्थापनाही करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांत तालुक्यात मोठ्या प्रमाणात दगड, वाळू, मुरुमाचे उत्खनन व वाहतूक होत असल्याचे प्रकार घडले होते. त्या अनुषंगाने आता पुन्हा वाळू, दगड, मुरुमाचे उत्खनन तसेच चोरटी वाहतूक होऊ नये, यासाठी येथील महसूल विभागातर्फे चार रात्रगस्त पथकांची तयार करण्यात आली आहे.
या पथकांद्वारे रात्रीच्या वेळी वाळू, दगड व मुरुमाच्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्याचे काम पाहिले जाणार असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड यांनी दिली.
वाळू, मुरुम, दगडखाणी यांच्या साठ्यामधून वाळू, मुरुम व दगड चोरीस जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा अनधिकृत वाळू, दगड, मुरुम याच्या वाहतुकीवर आळा घालण्यासाठी व होणारी अनधिकृत वाहतूक व उत्खनन यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचे मार्गदर्शनखाली चार स्वतंत्र पथके निर्माण करण्यात आली आहे. या पथकामार्फ त मुख्य रस्त्यांच्या ठिकाणी थांबून अनधिकृत वाळू वाहतुकीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. यावेळी अनधिकृतपणे वाळू, दगड तसेच मुरुमाची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
तहसीलदार राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार डी. ए. डुबल व निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकाद्वारे रात्रीच्या वेळी चोरट्या पद्धतीने होणाऱ्या वाळू, मुरूम तसेच दगड वाहतुकीवर लक्ष ठेवले जाणार आहे. (प्रतिनिधी)
असे असणार पथक
रात्रगस्तीसाठी तयार करण्यात येणाऱ्या पथकामध्ये नायब तहसीलदार डी. ए. डुबल व निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली १२ मंडल अधिकारी काम पाहणार आहेत. या १२ मंडल अधिकाऱ्यांसोबत २४ तलाठी रात्रीच्या वेळी चोरट्या वाहतुकीवर लक्ष ठेवणार आहे.