‘घड्याळवाले बाळासाहेब’ पुन्हा कपबशी घेणार...
By Admin | Updated: April 25, 2015 00:01 IST2015-04-24T23:59:26+5:302015-04-25T00:01:24+5:30
जिल्हा बँकेतील नाराजी नाट्य : शंभूराज यांची माघार ; उंडाळकरांसाठी राष्ट्रवादीचे नेत सरसावले

‘घड्याळवाले बाळासाहेब’ पुन्हा कपबशी घेणार...
प्रमोद सुकरे / कऱ्हाड
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी पुन्हा एकदा पक्षाविरोधात बंड केले आहे. विधानसभेला राष्ट्रवादीचे घड्याळचिन्ह घेऊन आमदार होणारे बाळासाहेब आता पुन्हा आवडते कपबशी चिन्ह घेऊन निवडणूक जिंकणार का, असा सवाल निर्माण झाला आहे. तर माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्याविरोधात पैलवान धनाजी पाटील-आटकेकर यांनी सोसायटी मतदार संघातून दंड थोपटल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक ५ मे रोजी होत आहे. त्यासाठी उत्तरचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी प्रक्रिया मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना राष्ट्रवादीच्या पॅनेलमधून उमेदवारी मिळेल, अशी आशा होती. मात्र, शुक्रवारी शेवटच्या दिवशी दादाराजे खर्डेकरांच्या पारड्यातच वजन पडल्याने बाळासाहेबांनी बंडाचे निशाणच हाती घेतले आहे. प्रक्रिया मतदारसंघात मर्यादित मतदान आहे. त्यातील फलटण अन् सातारा तालुक्यांतच पन्नास टक्के मतदान असल्याने राजेंनाच पुन्हा संधी देण्यात आल्याचे बोलले जाते; पण त्यामुळे बाळासाहेबांचे नाराजी नाट्य पाहायला मिळाले, हे निश्चित.
दरम्यान, कऱ्हाड तालुक्यातून सोसायटी मतदार संघातून राष्ट्रवादीशी सलगी असणाऱ्या विलासराव पाटील-उंडाळकरांना उमेदवारी निश्चित मानली जाते. त्यांच्याविरोधात नक्की कोण पैलवान रिंगणात उतरणार, याची उत्सुकता होती. पण, शुक्रवारी मानसिंगराव जगदाळे, प्रकाश पाटील, डी. बी. जाधव यांच्या अर्ज माघारीनंतर पैलवान धनाजी पाटील-अटकेकर यांनी दंड थोपटल्याचे स्पष्ट झाले. आटकेकर हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व आमदार बाळासाहेब पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे दक्षिणच्या फडात कोण बाजी मारणार, हे पाहावे लागणार आहे.
पाटण तालुक्यातून आ. शंभूराज देसाई यांनी विक्रमसिंह पाटणकरांचा विजयाचा मार्ग सुकर केल्याबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा बँकेत राजकारण नको, असा सूर आळविणाऱ्या देसार्इंनी अर्ज मागे घेतल्याने सर्वत्र चर्चा सुरू आहेत.