दुष्काळी माणची वाटचाल टंचाईमुक्तीकडे...

By Admin | Updated: December 28, 2015 00:58 IST2015-12-27T21:59:37+5:302015-12-28T00:58:01+5:30

शिवारे झाली जलयुक्त : शासकीय योजनांचा लाभ घेऊन श्रमदानातून होतोय कायापालट--पाणीटंचाई : भाग चार

Wasting of the drought-hit scarcity ... | दुष्काळी माणची वाटचाल टंचाईमुक्तीकडे...

दुष्काळी माणची वाटचाल टंचाईमुक्तीकडे...

नवनाथ जगदाळे-दहिवडी  -कायम दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा माण तालुका टंचाईमुक्तीकडे वाटचाल करीत आहे. तालुक्याला संजीवनी ठरणाऱ्या उरमोडी, जिहे-कटापूर योजना पूर्णत्वाकडे जात आहेत. उरमोडी योजना नव्वद टक्के पूर्ण आहे तर जिहे-कटापूरसाठीही निधी उपलब्ध झाला असल्याने या योजना पूर्णत्वास जातील अशी अपेक्षा आहे.
माण तालुक्यातील मोजकी गावे सोडली तर १०६ पैकी ९० गावांना दुष्काळात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पाणलोटच्या माध्यमातून माणला १३० कोटींचा निधी दिला. एकात्मिक पाणलोट विकासाच्या माध्यमातून १०६ पैकी ५१ गावांची निवड केली, तर उर्वरित ३१ गावे नव्याने समाविष्ट केली. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून व लोकसहभागातून तब्बल ११ कोटी ५० लाखांची कामे झाली. आतापर्यंत लहानमोठे ३०० ते ३२५ बंधारे तयार झाले. पाच ते साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर नाला बांध आणि दोनशे ते अडीचशे हेक्टर क्षेत्रावर खोलीकरण समानचर काढले. २५ ठिकाणी कृषी विभागाच्या आणि लोकसहभागातून ३६ बंधारे आता प्रस्तावित आहेत. नव्यानेच १८ बंधाऱ्यांसाठी ५ कोटी ५३ लाख मंजूर झाले आहेत. ४५ ठिकाणी रुंदीकरण व खोलीकरण, ५४ ठिकाणी तलाव, ओढे या ठिकाणचा गाळ काढण्यामुळे यावर्षाच्या सपूर्ण कामाचा विचार करता तीन हजार ते ३२०० टीसीएम एवढा पाणीसाठा करण्यात यश आले आहे.
यावर्षी डाळिंबाव्यतिरिक्त आंब्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होत आहे. त्यामुळे फळबाग व भाजीपाल्याचे क्षेत्र २५०० हेक्टरवर गेले आहे, तर जवळपास २२०० हेक्टर ठिबक सिंचन करण्यात यश आले आहे. तालुक्यात शेततळीही मोठ्या प्रमाणात असून, शासनाच्या धोरणानुसार मागेल त्याला शेततळे उपलब्ध होणार आहे.

पावसाळ्यानंतर माणमध्ये वेगळे चित्र दिसणार असले तरी सध्याची परिस्थिती तेवढीच भयानक आहे. तालुक्यात दरवर्षी सरासरी ४६५ मि. मी. पाऊस पडतो. यंदा २२३ मि. मी.च पाऊस पडल्याने तालुक्यातील सर्वच १०६ गावांची आणेवारी ५० पेक्षा कमी आहे. संपूर्ण तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी भटकंती करावी लागणाऱ्या मार्डी आणि बिदाल येथील शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले आहेत.

Web Title: Wasting of the drought-hit scarcity ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.