संरक्षक जाळीवरून कचरा ओढ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:38 IST2021-05-14T04:38:51+5:302021-05-14T04:38:51+5:30

संरक्षक जाळीवरून कचरा ओढ्यात सातारा : शहरातील नैसर्गिक ओढे व नाल्यांमध्ये कचरा साचू नये यासाठी सातारा पालिकेकडून ओढ्यांच्या दुतर्फा ...

In the waste stream from the protective net | संरक्षक जाळीवरून कचरा ओढ्यात

संरक्षक जाळीवरून कचरा ओढ्यात

संरक्षक जाळीवरून

कचरा ओढ्यात

सातारा : शहरातील नैसर्गिक ओढे व नाल्यांमध्ये कचरा साचू नये यासाठी सातारा पालिकेकडून ओढ्यांच्या दुतर्फा संरक्षक लोखंडी जाळी बसविण्यात आली आहेत. तरीही अनेक नागरिक तसेच वाहनधारक येता-जाता जाळीवरून कचरा टाकत असतात. घंटागाडी दारात येऊनही नागरिकांची ही वर्तणूक शहर स्वच्छतेला मारक ठरत आहे. ओढ्यात कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

उकाडा वाढल्याने

नागरिक हैराण

सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून, नागरिकांमधून फळे व शीतपेयांना मागणी वाढू लागली आहे. हवामान विभागाने गुरुवारी साताऱ्याचे कमाल तापमान ३७, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरातही उन्हाचे चटके आता जाणवू लागले आहेत.

भाजीपाल्याची

जादा दराने विक्री

सातारा : संचारबंदीमुळे सर्व अत्यावश्यक सेवा घरपोहोच उपलब्ध करण्याचे आदेश प्रशासनाने किराणा दुकानदार व भाजी विक्रेत्यांना दिले आहेत. भाजी विक्रेत्यांकडून घरपोहोच सेवा पुरविली जात असली तरी अनेक विक्रेते चढ्या भावाने भाजीपाल्याची विक्री करीत आहे. एकीकडे संचार बंदीमुळे रोजगार थांबले असताना दुसरीकडे भाजीपाल्याची अधिक दराने विक्री सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. विक्रेत्यांनी ग्राहकांची ही पिळवणूक थांबवावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

सदर बझारमध्ये

सांडपाणी उघड्यावर

सातारा : सर्वाधिक दाट लोकवस्तीचा परिसर असलेल्या सदर बाजार झोपडपट्टी परिसरात सांडपाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पालिकेकडून येथील गटारे बंदिस्त न केल्याने सांडपाणी उघड्यावरूनच वाहत आहे. याचा परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील गंभीर बनू लागला आहे. पालिकेने सांडपाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

कारवाई करूनही

वाहनधारक निर्धास्त

वाई : जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचे नियम कठोर करतानाच अत्यावश्यक कामाखेरीज घराबाहेर न पडण्याचे आवाहन नागरिक तसेच वाहनधारकांना केले आहे. तरीदेखील वाहनधारकांकडून शासन नियमांची सातत्याने पायमल्ली केली जात आहे. अनेक दुचाकी चालक शहरात फेरफटका मारताना दिसून येत आहेत. पालिका व पोलीस प्रशासनाकडून कारवाई करूनही वाहनधारक निर्धास्त आहेत. त्यामुळे पोलीस दलाला निर्धास्त वाहनधारकांवर अंकुश लावण्यासाठी आता कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.

Web Title: In the waste stream from the protective net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.