वारूंजीत खुरप्याने चिरला पत्नीचा गळा
By Admin | Updated: December 10, 2014 23:47 IST2014-12-10T23:13:19+5:302014-12-10T23:47:43+5:30
घरगुती वादाचे कारण : पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

वारूंजीत खुरप्याने चिरला पत्नीचा गळा
कऱ्हाड : अनैतिक संबंध व घरगुती वादातून पतीने पत्नीचा खुरप्याने गळा चिरून खून केला आणि विषारी औषध प्राशन करून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला. शिवाजीनगर-वारूंजी (ता. कऱ्हाड) येथील शिवारात आज, बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
दरम्यान, पतीने लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना घटनास्थळी सापडली असून, पत्नीच्या वागण्याला कंटाळून आपण हे कृत्य करीत असल्याचे त्याने त्यामध्ये लिहिले आहे. आशा अप्पासाहेब धुमाळ (वय ३५, रा. शिवाजीनगर-वारूंजी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. घटनास्थळावरील माहितीनुसार, शिवाजीनगरमध्ये धुमाळ कुटुंबीय वास्तव्यास आहेत. या कुटुंबातील अप्पासाहेबचा पत्नी आशाबरोबर वाद होत असे. अप्पासाहेबला दारूचे व्यसन होते. आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने दोघांत वारंवार वाद होत असत. बुधवारी सकाळी अप्पासाहेब पत्नी आशासोबत घरासमोर बोलत बसल्याचे शेजाऱ्यांनी पाहिले. त्यानंतर दोघेही तेथून निघून गेले. दरम्यान, दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सुरेश धुमाळ यांच्या उसाच्या फडातून महिलेचा ओरडण्याचा आवाज आल्याने शेजारी राहणारी एक मुलगी तेथे गेली. त्यावेळी आशा धुमाळ रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्या मुलीने पाहिले. तिने त्वरित गावात जाऊन याची माहिती दिली.
तत्पूर्वी शिवाजीनगरमधील एका फॅब्रिकेशन व्यावसायिकास अप्पासाहेबचा फोन आला होता. ‘पत्नी आशाचा खून करून मी आत्महत्या करायला निघालोय,’ असे त्याने त्याला सांगितले होते. त्यामुळे ग्रामस्थ घटनास्थळाकडे धावले. आशा यांचा दीर कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात गेला आणि पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे, सहायक निरीक्षक विद्या जाधव, तृप्ती देशमुख, उपनिरीक्षक नाईक व राठोड कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी गेले.
घटनास्थळी आशा यांचा मृतदेह आढळून आला. खुरप्यासारख्या शस्त्राने गळा चिरून त्यांचा खून करण्यात आल्याचे पाहणीनंतर स्पष्ट झाले. पंचनाम्यानंतर पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठविला. दरम्यान, विषारी औषध प्राशन केलेल्या स्थितीत अप्पासाहेब सायंकाळी उशिरा नातेवाईकांना आढळून आला.
पतीचे कपडे घटनास्थळीच
आशा यांच्या मृतदेहानजीकच पोलिसांना अप्पासाहेबचे रक्ताने माखलेले कपडे आढळून आले. आत्महत्येची चिठ्ठीही सापडल्याने पोलिसांनी तातडीने अप्पासाहेबचा शोध सुरू केला. शिवारातील विहिरींमध्येही पोलिसांकडून शोध घेतला जात होता. मात्र, विषारी औषध प्राशन केलेल्या स्थितीत तो शिवारातच आढळून आला.
रविराज, शिवानीला सांभाळा!
घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी आढळून आली. घरगुती वादासह अनैतिक संबंधाबाबत अप्पासाहेबने चिठ्ठीमध्ये लिहिले आहे. ‘मी पत्नीचा खून केलाय. त्याला कोणासही दोषी धरू नये. मीसुद्धा आत्महत्या करतोय. आमच्या रविराज व शिवानीला सांभाळा,’ असे त्याने लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले.