राजू शेट्टी, खोत यांच्यासह चौघांविरुद्ध अटक वॉरंट
By Admin | Updated: August 9, 2015 00:46 IST2015-08-09T00:40:29+5:302015-08-09T00:46:22+5:30
२५ आगस्टला सुनावणी : २०१३ मध्ये आंदोलनप्रकरणी दाखल केले दोषारोपपत्र

राजू शेट्टी, खोत यांच्यासह चौघांविरुद्ध अटक वॉरंट
कोरेगाव : कोरेगाव येथे २०१३ मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्राच्या अनुषंगाने कोरेगाव न्यायालयाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, ज्येष्ठ नेते भाई पंजाबराव पाटील व जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले आहे. याप्रकरणी २५ आॅगस्टला सुनावणी होणार आहे.
उसाला एफआरपीप्रमाणे दर द्यावा, यासह शेतकरी हिताच्या
अनेक मागण्यांसाठी २०१३ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोरेगाव आणि परिसरात तीव्र आंदोलने केली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे नोंद झाले होते. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एन. पाटील यांनी नुकतेच याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, ज्येष्ठ नेते भाई पंजाबराव पाटील व जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले आहे.
नवी दिल्ली येथे संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्या परवानगीने खासदार शेट्टी यांच्या विरोधातील वॉरंटची बजावणी करण्याचे निर्देश न्या. पाटील यांनी दिले आहेत. त्याचबरोबर कोरेगाव पोलीस ठाण्याने स्वतंत्र कर्मचारी नेमून या वॉरंटची अंमलबजावणी करण्याबाबत स्पष्ट सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. याप्रकरणी आता २५ आॅगस्टला सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)