सातारा : तलाठी परीक्षेत निवड झालेल्या परीक्षार्थींना वर्षाचा कालावधी उलटून गेला तरीदेखील नेमणूक दिली गेली नसल्याने या कर्मचाऱ्यांनी मॅटमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
या नियुक्तीच्या संदर्भाने हे उमेदवार सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. निवडीयाबतची सविस्तर माहितीदेखील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली; परंतु जिल्हाधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने हे उमेदवार नाराज झाले आहेत.
यासंदर्भात माहिती अशी की, सातारा जिल्हाधिकारी तलाठी भरतीसाठी फेब्रुवारी २०२९ मध्ये अर्ज मागविण्यात आले होते. ही परीक्षा जुलै २०१९ मध्ये घेण्यात आली. साधारण सप्टेंबर, ऑक्टोबर २०१९ मध्ये परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या घटनेला १७ ते १८ महिन्यांचा कालावधी होऊन गेला आहे; पण अद्याप सातारा जिल्हा निवड समितीने व जिल्हाधिकारी यांनी उमेदवारांना नियुक्त्या दिल्या नाहीत. याच परीक्षेतून इतर जिल्ह्याचे निवड करण्यात आली. त्यांना नियुक्त्या देण्यात आल्या; मात्र सातारा जिल्ह्यात अजून त्यांना हजर करून घेतले नाही. मध्यंतरी असणारे कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊन यामुळे हे उमेदवार शांत बसले होते; पण त्यानंतर रखडलेली पाच जिल्ह्याची तलाठी भरती तत्काळ करावी, असे परिपत्रक शासनाने काढूनसुद्धा आजतागायत उमेदवारांना हजर करून घेतलेले नाही. परीक्षा सर्वांनी एकत्र दिली, सेवा देताना भेदभाव का? एक दीड वर्षांच्या दिरंगाईने झालेले आर्थिक मानसिक कौटुंबिक नुकसानास जबाबदार कोण? आमचा गुन्हा काय? की आम्ही साताऱ्याला अर्ज केला? देशातील बेरोजगारी वाढत असताना एक दीड वर्षे कोणतीही जाहिरात नाही. कोणती परीक्षा नाही आणि उत्तीर्ण होऊनसुद्धा जुलै २०१९ च्या परीक्षेचे जॉईन नाही. आमचे भवितव्य प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईने टांगणीला लागलेले आहे, त्यामुळे नियुक्तीबाबत मॅटमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पूजा नार्वेकर या महिला परीक्षार्थींनी दिली.