वाईत भरदिवसा पाच लाख लांबविले
By Admin | Updated: March 17, 2016 23:36 IST2016-03-17T23:28:00+5:302016-03-17T23:36:58+5:30
बँकेच्या जिन्यातील प्रकार : सोसायटीच्या वयोवृद्ध सचिवाची पिशवी हिसकावून पोबारा

वाईत भरदिवसा पाच लाख लांबविले
वाई : येथील भाजी मंडईसारख्या गजबजलेल्या ठिकाणी सुमारे ५ लाख १२ हजारांची रोकड असलेली पिशवी हिसकावून चोरट्याने पोबारा केला. एका सोसायटीत असलेल्या वीजबिल भरणा केंद्रात जमा झालेली रोकड संस्थेचा वयोवृद्ध सचिव बँकेत भरण्यासाठी घेऊन गेला असता बँकेच्या जिन्यातच ही घटना घडली.वाई को-आॅपरेटिव्ह कंझ्युमर सोसायटीत वीजबिलाचा भरणा करण्याचे केंद्र आहे. तेथे जमा होणारी रोकड रोजच्या रोज बँकेत भरलीजाते. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास सोसायटीचे सचिव प्रभाकर रघुनाथ जोशी (वय ८४, रा. रविवार पेठ, वाई) हे ५ लाख ११ हजार ८२० रुपयांची रोकड घेऊन बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत भरणा करण्यासाठी गेले होते. त्यांच्या हातात पैशांची पिशवी होती. चोरट्याने ही पिशवी हिसका देऊन ओढून घेतली आणि पैशांसह पोबारा केला़, अशी फिर्याद जोशी यांनी दिली आहे़वाई पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, गुरूवारी सकाळी अकरा वाजता प्रभाकर जोशी हे मंडईजवळ असलेल्या बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत बिलाच्या रकमेचा भरणा करण्यासाठी गेले होते.
बँकेच्या जिन्यावरच चोरट्याने हातातील पैशांच्या पिशवीला हिसका दिला आणि गर्दीचा फायदा घेत पळून जाण्यात चोरटा
यशस्वी झाला़
दरम्यान, जोशी यांनी ‘चोर-चोर’ म्हणत पाठलाग केला; परंतु चोरट्याचा साथीदार किसन वीर चौकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दुचाकी घेऊन तयारीत उभा होता. चोरटा दुचाकीवर बसल्यानंतर दोघे सुसाट पळून गेले. चोरट्यांचा
छडा लावण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज हा एकमेव पर्याय
उपलब्ध असून, त्याची तपासणी सुरू आहे़ पोलिस निरीक्षक रमेश गंलाडे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)