पाणी पाहिजे..? दिवसाला १ लाख भरा!
By Admin | Updated: August 28, 2015 22:46 IST2015-08-28T22:46:58+5:302015-08-28T22:46:58+5:30
आठ गावांचा प्रश्न : खटाव तालुक्याच्या हक्काचे पाणी दुष्काळग्रस्तांच्या डोळ्यांदेखत निघाले कऱ्हाडकडे--धरणांच्या जिल्ह्यात पाण्याचा दुष्काळ

पाणी पाहिजे..? दिवसाला १ लाख भरा!
राजू पिसाळ -पुसेसावळी खटाव तालुक्यातील पूर्व भागातून उरमोडीचा पाट पाण्याने भरून वाहत आहे. तरीही या भागातील शेतकऱ्यांची पिके उन्हामुळे करपून गेली आहेत. शेतकऱ्यांनी पाणी मागितले तर तसे पाणी सोडता येत नाही. पाणी पाहिजे असल्यास एक दिवसाचे एक लाख रूपये भरा, असे प्रशासनाकडून सांगितले जाते. त्यामुळे हक्काच्या पाण्यात स्वप्ने वाहून जाताना उघड्या डोळ्यांनी बघण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी पुनर्वसितांना जमिनी दिल्या. एवढा त्याग करूनही आपल्या भागातून दुसरीकडे जाणारे पाणी आपल्या तहानलेल्या पिकांना मिळत नाही, याची खंत शेतकऱ्यांना आहे. निवडणुका आल्या की पाण्याचे राजकारण केले जाते अन् सत्ता मिळाली की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाते. त्यामुळे उशाला वाहतोय पाट तरीही पिकांची लागलीय वाट, असे चित्र या भागात आहे.दुष्काळी भाग असूनही प्रशासन पाण्याबाबत काहीच हालचाली करत नाही. ज्या गावाचा पुढारी मोठा तिथे पाणी सोडले जाते; मात्र जिथे खरंच गरज आहे अशा भागावर अन्याय होतो. पुसेसावळीसह आठ गावांमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. पारगाव तलाव कोरडा पडला आहे. तिथे उरमोडीचे पाणी सोडण्याची मागणी मान्य होत नाही. ही योजना दुष्काळी भागासाठी असताना या उरमोडीचे पाणी या ठिकाणापासून कऱ्हाडकडे निम्मे आणि उरमोडी पाटाकडे निम्मे सोडले जाते. याबाबत राजकीय नेतेमंडळी मूग गिळून गप्प का, असा सवाल शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
आम्ही सातत्याने उरमोडीच्या पाण्याची मागणी करूनसुध्दा पाणी सोडले जात नाही. सध्या गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा आहे. तरी टंचाईतून गावाला पाणी सोडावे, अशी मागणी आम्ही ग्रामपंचायतीच्यामार्फत केली आहे.
- रोहिणी जितेंद्र कदम, सरपंच (म्हासुर्णे)
उरमोडी ही योजना दुष्काळी भागासाठी सुरू केली आहे आणि याच भागाला पाणी मिळत नाही. प्रत्येकवेळी दुष्काळी पूर्व भागावर अन्याय केला जात आहे. सांगली जिल्ह्याला पाणी ओढ्या-नाल्याने वाहत असून, दुष्काळी भागावर अन्याय का, याचे उत्तर प्रशासनाने दिले पाहिजे.
- श्रीकांत पिसाळ, ग्रामपंचायत सदस्य, चोराडे
दुष्काळी भागाच्या व्यथा राजकीय नेतेमंडळींजवळ सातत्याने मांडल्या आहेत; परंतु ठोस अशी कार्यवाही होत नसल्याने पाटाचे पाणी उघड्या डोळ्यांनी नुसतेच बघावे लागत आहे, ही शोकांतिका आहे.
- संतोष घार्गे, सरपंच, वडगाव (ज.स्वा.)
चोराडेबरोबर रहाटणी, शेनवडी, वांझोली, वडगाव या गावांच्या हद्दीतून हा उरमोडीचा पाट जातो; परंतु या गावांना पाणी मिळत नाही. कुठे तलाव भरायचा आहे, कुठल्या पुढाऱ्याने सांगितले की, त्याच्या गावाकडे तालुक्याला पाणी जाते; परंतु या पाटात ज्यांच्या जमिनी जाऊनसुध्दा त्यांना गप्प बसावे लागते, हा अन्याय किती दिवस सहन करायचा?
- सुहास पिसाळ, चोराडे