मैदानात उतरायचं अन् कुस्ती मारायचीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:25 IST2021-09-02T05:25:39+5:302021-09-02T05:25:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सोसायटी मतदारसंघातून सन्मानानं दाखल होण्यासाठी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी जोरदार ...

मैदानात उतरायचं अन् कुस्ती मारायचीच!
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सोसायटी मतदारसंघातून सन्मानानं दाखल होण्यासाठी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी जोरदार तयारी केलेली आहे. मैदानात उतरायचं अन् कुस्ती मारायची, असं त्यांचं ठरलंय, त्यामुळे कऱ्हाड सोसायटी मतदारसंघात संघर्षाचे चित्र निर्माण झाले आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे. कऱ्हाड सोसायटी मतदारसंघातून इच्छुक असलेले सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे नागरी बँका, सहकारी पतसंस्था मतदार संघातून डॉ. अतुल भोसले यांना उमेदवारी द्यावी, यासाठी देखील आग्रही असल्याची चर्चा आहे. त्या बदल्यात अतुल भोसले समर्थकांची सोसायटी मतदार संघातील २० मते आपल्या पारड्यात पाडून घेण्याचा सहकार मंत्र्यांचा प्रयत्न आहे.
कऱ्हाड दक्षिणमधील २० सोसायटींचे ठराव हे भाजपाचे डॉ. अतुल भोसले यांचे नेतृत्व मानणाऱ्यांच्या नावे आहेत. ही मते मिळविण्यासाठी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील प्रयत्नशील आहेत. या मतांच्या बदल्यात नागरी बँका, सहकारी पतसंस्था मतदार संघातील सर्वपक्षीय पॅनलची उमेदवारी आपणास मिळावी, असा डॉ. अतुल भोसले यांचा प्रयत्न आहे. कारण, कराड जनता सहकारी बँक दिवाळखोरीत निघाली आहे. त्यामुळे या मतदार संघातील विद्यमान संचालक राजेश पाटील-वाठारकर यांचा नावाचा ठराव नाही. त्यांचा पत्ता जिल्हा बँकेच्या राजकारणातून कट झाला आहे. त्यामुळे डॉ. अतुल भोसले यांनी या मतदार संघातील उमेदवारीची मागणी केल्याचे समजते. अतुल भोसले यांचे नेतृत्व मानणाऱ्या सोसायटी मतदारांची मते मिळविण्यासाठी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे अतुल भोसलेंच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत.
ॲड. उदयसिंह पाटील यांचे पारडे जड?
कराड सोसायटी मतदारसंघात १४० मतदारांपैकी उदयसिंह पाटील यांच्याकडे ८० मते असल्याचे सांगितले जात आहे तर बाळासाहेब पाटील यांनी बर्याच मतांची जुळणी केल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. सहकार मंत्री आणि उंडाळकर गटाने मतदार भेटीच्या अनेक फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. आता बाळासाहेब पाटील आणि ॲड. उदयसिंह पाटील हे स्वत: मतदारांच्या भेटी घेणार आहेत. सध्या तरी ॲड. उदयसिंह पाटील यांचे पारडे जड आहे. त्यामुळे सहकार मंत्र्यांनी सर्व ताकद पणाला लावली आहे. दोघांनीही कराड सोसायटी मतदार संघातील उमेदवारीवर दावा केला आहे. माघार घेणार नसल्याचा पवित्रा दोघांनीही घेतला आहे. त्यामुळे कराड आणि माण तालुका सोसायटी मतदार संघातील निवडणूक अटळ आहे.
माणमध्ये धुमशान अटळ
बँकेच्या विरोधात आंदोलन केलेल्या माणचे आमदार जयकुमार गोरे यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करणार असल्याने कऱ्हाड आणि माण तालुका सोसायटी मतदार संघातील निवडणूक अटळ बनली आहे. दरम्यान, बँकेच्या विरोधात आंदोलन केलेल्या माणचे आमदार जयकुमार गोरे यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करणार असल्याने कऱ्हाड आणि माण तालुका सोसायटी मतदार संघातील निवडणूक अटळ बनली आहे.
कोरेगाव, जावळी, वाईतही सामना
कोरेगाव सोसायटी मतदारसंघातून विद्यमान सुनील माने हे संचालक म्हणून काम पाहत आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांचे इच्छुक अडून बसलेत. जावलीत आमदार शशिकांत शिंदे यांच्याविरोधात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणारी मंडळी पुढे सरसावली आहेत. तर वाई सोसायटी मतदारसंघातूनही आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गात अनेक खाचखळगे निर्माण झाले आहेत.