बांधकाम करायचंय? ..भरा डिपॉझिट!
By Admin | Updated: December 30, 2014 23:28 IST2014-12-30T22:53:11+5:302014-12-30T23:28:14+5:30
नवीन नियमावली : अनधिकृत बांधकामाला बसणार लगाम

बांधकाम करायचंय? ..भरा डिपॉझिट!
दत्ता यादव -सातारा -तुम्ही मंजूर आराखड्यापेक्षा जास्त बांधकाम करीत नाही ना? ओढ्यावर अतिक्रमण तर करत नाही ना? तुम्ही नाही म्हणाल; पण पालिका आता तुमच्यावर भरोसा ठेवणार नाही. बांधकाम सुरू करताना डिपॉझिट भरा आणि आराखड्याप्रमाणे बांधकाम आहे, हे सिद्ध करून पैसे परत न्या.. पण तेही बिनव्याजी.
सातारा शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा फार पूर्वीपासून गाजत आहे. वर्षानुवर्षे केवळ अतिक्रमण हाच मुद्दा घेऊन विरोधकांपासून ते नागरिकांपर्यंत सर्वच जणांना अतिक्रमण हा शब्द आता ‘अति’ व्हायला लागलेय, असे वाटू लागले आहे.
शहरात सध्या सुमारे १२० इमारतींची बांधकामे सुरू आहेत. मात्र अनेकजण पूर्णत्वाचा दाखला पालिकेतून नेत नाहीत. मनाला वाटेल तसे अतिक्रमण करून बांधकाम केले तरी बेहत्तर, अशी मानसिकता ठेवून अतिक्रमण करत होते. या सर्व प्रकाराला आता लगाम बसणार आहे. ज्याला नवीन बांधकाम करायचे आहे, त्या बांधकामाचे जेवढे क्षेत्रफळ आहे, तेवढे पैसे पालिकेत ‘सुरक्षा अनामत रक्कम’ म्हणून जमा करावी लागणार आहे. शंभर रुपये प्रतिचौरसप्रमाणे जेवढे पैसे होतील, तेवढे पालिकेच्या तिजोरीत हे पैसे जमा होणार आहेत. सरासरी एका बांधकाम व्यावसायिकाला दोन लाख रुपये जमा करावे लागतील.
बांधकाम पूर्ण होईपर्यंत हे पैसे पालिकेतच असणार आहेत. तेही बिनव्याजी. अनेकजण बांधकाम करताना इमारतीचे काम अगदी रेंगाळत करत असतात. त्यांना खरं तर या नवीन नियमावलीचा चांगलाच फटका बसणार आहे. जर का वेळेत काम केले नाही, तर त्यांचे पैसे त्यांना परत मिळण्यास तितकाच वेळ जाणार आहे. परिणामी भरलेल्या पैशावर मिळणारे व्याज पालिकेला मिळणार आहे. त्यामुळे साहजिकच पैसे परत मिळावे म्हणून लवकर बांधकाम उरकण्याकडे बांधकाम व्यावसायिकांचा कल असणार आहे.
पालिकेकडे आलेले डिपॉझिट पालिकेच्या स्वतंत्र खात्यावर जमा होत असते. त्यातून पालिकेला व्याजही मिळते. त्यामुळे पालिकेची तिजोरी हाऊसफुल्ल होणार आहे. शहरातील विकासकामांनाही ही रक्कम त्यांना वापरता येणार आहे.
बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न घेता काहीजण पालिकेच्या डोळ्यात धूळफेक करत होते, अशांना आता ‘सेफ डिपॉझिट’मुळे चपराक बसणार आहे. पूर्वी मंजूर आराखड्याप्रमाणे अनेक ठिकाणी कामे झाली नाहीत, असा सातत्याने आरोप होत होता. परंतु भविष्यात ‘सेफ डिपॉझिट’मुळे मंजूर आराखड्यानुसारच कामे होतील, अशी पालिका प्रशासनाला आशा आहे.
काही महिन्यांपूर्वी नवीन नियमावली सुरू झाल्यानंतर सातारा पालिकेने सर्वात अगोदर त्याची अंमलबजावणी सुरू केली. सेफ डिपॉझिटचा दर किती ठेवायचा यामध्येच इतर पालिकांचा खल सुरू आहे. पण शंभर रुपये प्रतिचौरसप्रमाणे जेवढे पैसे होतील, तेवढा दर ठरवून पालिकेने ही रक्कम जमा करायलाही सुरूवात केली आहे. शहरात सध्या सुमारे १२० बांधकामे सुरू असून या सर्वांकडून पालिकेने ‘सेफ डिपॉझिट’ म्हणून सुमारे १ कोटी घेतले आहेत. त्यामुळे पालिकेला आता मोठा आर्थिक हातभार लागला आहे.
या नवीन नियमावलीमुळे मंजूर आराखड्याप्रमाणे कामे होतील. नागरिकांनीही मंजूर आराखड्याप्रमाणे बांधकाम करावे आणि तातडीने बांधकाम पूर्ण करून आपले डिपॉझिट परत न्यावे.
- प्रशांत राजे (नगररचनाकार )