पाण्यासाठी रखरखत्या उन्हात भटकंती

By Admin | Updated: May 12, 2015 23:41 IST2015-05-12T21:53:57+5:302015-05-12T23:41:47+5:30

रणसिंगवाडीत पाणीटंचाई : जलस्रोत आटले; टॅँकरचा प्रस्ताव धूळखात; प्रशासनाचे मात्र अजूनही दुर्लक्षच

Wandering in the sunlight for water | पाण्यासाठी रखरखत्या उन्हात भटकंती

पाण्यासाठी रखरखत्या उन्हात भटकंती

पुसेगाव : खटाव तालुक्याच्या उत्तर भागात डोंगराळ परिस्थितीत जगणाऱ्या रणसिंगवाडी या गावातील लोकांचे पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. गावात आठ-आठ दिवस नळाला पाणी येत नसल्याने घरातील मोठ्या माणसांबरोबर लहान मुलांनासुद्धा रखरखत्या उन्हात पाण्याच्या शोधार्थ घराबाहेर भटकावे लागत आहे. गेल्या महिन्यात २० एप्रिल रोजी टँकर मागणीचा प्रस्ताव येथील ग्रामपंचायतीने पंचायत समिती कार्यालयाकडे देऊन सुद्धा अद्याप काहीही कार्यवाही झाली नाही.
रणसिंगवाडी हे या तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागातील एक हजार तीनशे लोकसंख्येचे गाव आहे. गावातील प्रत्येकाकडे पशुधन ही मोठ्या प्रमाणावर आहे. या गावासाठी असलेल्या दोन्ही पाणीपुरवठा योजना केव्हाच कोलमडून गेल्या आहेत. उन्हामुळे विहिरींही कोरड्या पडल्या आहेत. शासन दरबारी पिण्याच्या पाणी टँकरची मागणी महिन्याभरापूर्वी करूनही येथील जनतेकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही.शासनाचे दोन टँकरने पाणी आणून गावातील आडात सोडले तर सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून गावातील प्रत्येक भागाला एक-एक दिवस पाणीपुरवता येईल; मात्र नेत्यांना रणसिंगवाडी ग्रामस्थांकडे पाहण्यास वेळ मिळत नसल्याने येथील जनता कमालीची संतापली आहे. ग्रामस्थांना स्वत:बरोबरच जनावरांची तहान भागविणे अक्षरश: मुश्कील झाले आहे. येथील लोकांचा दिवस उजाडतो आणि मावळतो तो फक्त पाण्यासाठीच.
शासकीय स्तरावरून उपाययोजना करताना केवळ कागदोपत्री पूर्तता नको, तर प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे, अशी अपेक्षा रणसिंगवाडीचे ग्रामस्थांंमधून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)

पशुधन धोक्यात
तीव्र दुष्काळी स्थितीमुळे उत्तर खटाव तालुक्यातील जनता पाणी, समस्यांनी अक्षरश: हैराण झाली आहे. दुष्काळाच्या वाढत्या झळांनी नागरिकांसह जनावरांची स्थिती बिकट करून ठेवली आहे. पाण्याअभावी जगणे मुश्कील झाले असून, अशा परिस्थितीत लाखमोलाचे पशुधन कवडीमोल किमतीत विकण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय उरला नाही.
ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात
विविध निवडणुकांत दंग झालेल्या व गुलालात लाल झालेल्या लोकप्रतिनिधींना येथील जनतेच्या दु:खाची जराही जाणीव होताना दिसत नाही.येत्या दोन चार दिवसांत पाण्याचा टँकर शासनाने सुरू न केल्यास ग्रामस्थ जनावरांसह वडूज तहसील व पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढण्याच्या पवित्र्यात आहेत .

Web Title: Wandering in the sunlight for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.