वडापच्या जीवघेण्या स्पर्धेत प्रवाशांचा जीव टांगणीला

By Admin | Updated: July 27, 2014 23:07 IST2014-07-27T22:11:45+5:302014-07-27T23:07:45+5:30

धोकादायक रस्त्यांवर वाहने भरधाव- अनेक चालकांचे मद्यपान

Wandeep's life-threatening contest | वडापच्या जीवघेण्या स्पर्धेत प्रवाशांचा जीव टांगणीला

वडापच्या जीवघेण्या स्पर्धेत प्रवाशांचा जीव टांगणीला

तारळे : तारळे - नागठाणे रस्त्यावर वडापच्या शर्यतीत प्रवाशांचा जीव टांगणीला लागत आहे़ तसेच या मार्गावर कोंजवडे फाट्यानजीक अपघाती वळण असल्याने या वळणावरही मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वडापचालकांना शिस्त लावण्याबरोबर चालकाचा परवाना तपासण्याची मोहीम पोलिसांनी राबविणे गरजेचे आहे़ कोंजवडे फाट्यावरील वळणावर काही दिवसांपूर्वी प्रवासी वाहतूक करणाऱ्या उभ्या जीपला दुसऱ्या वडाप जीपने जोरदार धडक दिली़ याठिकाणी वारंवार असे प्रकार घडत असले तरी त्यातून काहीच बोध न घेता अतिउत्साही चालकांकडून भरधाव वेगात व बेदरकारपणे वाहने चालविली जात आहेत. कोंजवडे येथील मुख्य चौकातून नागठाणे, मुरबाड, कडवे यासह तारळे विभागातील रहदारी मोठ्या प्रमाणात होते. संबंधित मुख्य चौकानजीक धोकादायक वळण असून, त्यालगत रुंद ओढा आहे़ ओढ्यात संपूर्ण खडक असल्याने संरक्षक कठड्याआभावी व खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या चुकीच्या पद्धतीने उभ्या केल्या जात असल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता आहे़तारळे विभागात अनेक अपघात घडले आहेत. काही अपघातांची पोलीस दप्तरी नोंद होते़ तर काही प्रकरणे तडजोडीने मिटवली जातात़; पण या अपघातातून चालक मात्र काहीच बोध घेताना दिसत नाहीत़ परिणामी गरजेपोटी खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे़ (वार्ताहर)

अनेक चालकांचे मद्यपान
तारळे विभागात नागठाणे, काशीळ अशा ठिकाणी जाण्यासाठी शेकडो खासगी जीप आहेत़ तसेच अनेक चालक मद्यपान करून गाड्या चालवत असल्याचे चित्र दिसून येते़ सर्व नियम धाब्यावर बसवून धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जात आहे़ त्यावर चाप बसवणे गरजेचे आहे़ मूठभर चालकांमुळे इतर चालकांना मनस्ताप होणार असेल तर त्याच्या चालकांवर इतर चालकांनी जरब बसविणे गरजेचे आहे़

Web Title: Wandeep's life-threatening contest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.