महसूल कर्मचाऱ्यावर वाळूमाफियाचा हल्ला
By Admin | Updated: November 7, 2015 23:36 IST2015-11-07T22:45:53+5:302015-11-07T23:36:59+5:30
प्रकरण दडपल्याचा शिवसेनेचा आरोप

महसूल कर्मचाऱ्यावर वाळूमाफियाचा हल्ला
दहिवडी : दहिवडी प्रांताधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याला वाळूमाफियांनी मारहाण केल्याचे प्रकरण दडपण्यात आले आहे. याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
याबाबत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांनी निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, दहिवडी प्रांत कार्यालयातील चव्हाण यांनी पांढरवाडी ते निढळदरम्यान वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रक अडविला होता. त्यावेळी कारमधून आलेल्या काहीजणांनी खोरी व लाकडी दांडके हातात घेऊन चव्हाण यांना दमदाटी केली. त्यानंतर वाळूमाफियांनी वाळूचा ट्रक घेऊन पलायन केले. वास्तविक या प्रकरणात वाळूमाफियांवर कारवाई होणे गरजेचे होते; परंतु एका अधिकाऱ्यानेच या प्रकरणात तडजोड केली आहे. हे प्रकरण मिटविण्यात आले आहे. सध्या येथील महसूल कर्मचारी दबावाखाली काम करीत आहेत. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे. (प्रतिनिधी)