विनामास्क फिरताय, विचारल्याने होमगार्डला धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:47 IST2021-06-09T04:47:10+5:302021-06-09T04:47:10+5:30
सातारा: तालुक्यातील लिंब गावच्या हद्दीत होमगार्डच्या अंगावर लोखंडी गज घेऊन धावून जात त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी लिंब येथील एकावर गुन्हा ...

विनामास्क फिरताय, विचारल्याने होमगार्डला धक्काबुक्की
सातारा: तालुक्यातील लिंब गावच्या हद्दीत होमगार्डच्या अंगावर लोखंडी गज घेऊन धावून जात त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी लिंब येथील एकावर गुन्हा दाखल झाला आहे. वैभव पवार असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून रात्री उशिरापर्यंत त्याला अटक झालेली नव्हती. ही घटना दि. ६ जून रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, वैभव पवार याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, कोरोना महामारीत कडक संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रविवार, दि. ६ जून रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास लिंब चौकात सुहास वसंत भिलारे (वय २५, रा. बामणेवाडी, पो. वालुथ, ता. जावळी, जि. सातारा) आणि शिंदे हे दोन होमगार्ड कर्तव्य बजावत होते. ''गावातील लोकांनी विनाकारण फिरू नये,'' अशी सूचना दोघेही देत होते. या वेळी वैभव संजय पवार (रा. लिंब, ता. सातारा) हा विनामास्क फिरत होता. या वेळी त्याला भिलारे यांनी रोखले आणि ''विनामास्क का फिरत आहात,'' अशी विचारणी केली. या वेळी पवार याने ''तुम्ही होमगार्ड, मला विचारणारे कोण..?,'' असा सवाल करतच हातात असलेला लोखंडी गज घेऊन पवार हा भिलारे यांच्या अंगावर धावून गेला.
याप्रकरणी सुहास भिलारे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर वैभव पवार याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक चौधरी करत आहेत.