वाखरी तलावाची ५४ वर्षांत एकदाही दुरुस्ती नाही!
By Admin | Updated: February 15, 2016 01:21 IST2016-02-14T00:39:24+5:302016-02-15T01:21:54+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष : भिंती कमकुवत, सांडव्याला भगदाड

वाखरी तलावाची ५४ वर्षांत एकदाही दुरुस्ती नाही!
वाठार निंबाळकर : फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर, शेरेचीवाडी, तरटेमळा यासह परिसरातील अनेक गावांची तहान भागविणाऱ्या वाखरी तलावाची गेल्या ५४ वर्षांत एकदाही डागडुजी केलेली नाही. तलावाच्या भिंती जीर्ण झाल्या आहेत, तर सांडव्याला भगदाड पडले आहे. त्यामुळे पाणी वाहून जाऊन तलाव सतत कोरडा पडतो.
फलटण तालुक्यातील वाखरी येथे १९६२ मध्ये तलाव बांधण्यात आला. त्यामुळे या भागातील अनेक गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागला. मात्र १९६२ ते २०१६ या ५४ वर्षांत तलावाची एकदाही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. शासन पाणीप्रश्नासाठी विविध योजना राबवित आहे. नद्यांवर बंधारे बांधत आहे. जुन्या तलावांतील गाळ काढून त्याची डागडुजी करत आहे. ज्या-ज्या ठिकाणी पाणी अडविणे शक्य आहे, तेथे छोटे-मोठे बंधारे बांधले जात आहेत. नदी पुनरुज्जीवनासारखे उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, वाखरी तलावाच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे.
दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याचे दुभिक्ष्य जाणवू लागले आहे. पावसाळ्यापूर्वी तलावाची दुरुस्ती झाली असती तर पाणीप्रश्न सुटला असता; पण या तलावाला कोणी वालीच नसल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)