ढेबेवाडीला प्रतीक्षा ‘सभापतीं’ची!
By Admin | Updated: July 23, 2014 22:31 IST2014-07-23T22:18:57+5:302014-07-23T22:31:24+5:30
आरक्षण : ‘बोनस’ म्हणून परिसराला संधी मिळणार का ?

ढेबेवाडीला प्रतीक्षा ‘सभापतीं’ची!
ढेबेवाडी : पाटण तालुक्याच्या राजकीय क्षेत्रातील सत्ता परिवर्तनाचे शक्तिकेंद्र म्हणून ढेबेवाडी विभागाकडे पाहिले जाते़ या विभागातील प्रत्येक हालचालीवर पाटणकर - देसाई गटांचे बारकाईने लक्ष असते़ आपले राजकीय हाल होऊ नयेत म्हणून दोघेही विकासाबरोबर तालुक्याची महत्त्वाची पदे याच विभागास बहाल करून एकमेकांवर चाल करतात़ सध्या दोन्ही गटांची चेअरमन-सभापती पदे याच विभागात असल्याने कुस्ती बरोबरीत सुटली आहे़; पण आता जाहीर झालेल्या पंचायत समिती सभापती पदाची लॉटरी पाटणकर गटाला लागल्याने हे पद ढेबेवाडी विभागास बोनस म्हणून देऊन आपले पारडे जड करणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत़
निवडणुका आल्या की, ढोल बडवणारे नेते जागे होतात, ही जरी वस्तुस्थिती असली तरी पाटण तालुका याला अपवाद आहे़ या तालुक्यातील नेते निवडणुका असो किंवा नसो. सदैव गळ्यात ढोल बांधून प्रसिध्दीमाध्यमांच्या सहकार्याने तालुकाभर वाजवत असतात़
तालुक्यातील पंचायत समिती, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, शिवदौलत बँक, पाटण अर्बन बँक, साखर कारखाना, आदी महत्त्वपूर्ण सत्तांवर देसाई-पाटणकर गटांचे वर्षानुवर्षे वर्चस्व आहे़ मुख्यमंत्री, सिक्कीमचे राज्यपाल, विधान परिषदेवर आमदार अशा महत्त्वाच्या ठिकाणी याच तालुक्याचे सुपुत्र पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील, नरेंद्र पाटील अशी वरिष्ठ नेतेमंडळी असताना सुद्धा सध्यातरी तालुक्यातील सर्वच सत्तास्थानांपासून दूर ठेवण्यात देसाई-पाटणकर यशस्वी झाल्याचे चित्र दिसत आहे़
तसा विचार केला तर पाटण तालुका ढेबेवाडी, पाटण, कोयनानगर, तारळे आणि मल्हारपेठ अशा पाच विभागांनी जोडला गेला आहे़ यापैकी पाटणमध्ये पाटणकरांचे तर मल्हारपेठ-मरळीमध्ये देसाई गटाचे नेहमीच पारडे जड असते; पण अलीकडे दहा वर्षांपासून ढेबेवाडीचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे़ या विभागातून काँग्रसचे नेते हिंदुराव पाटील यांनी ‘किंगमेकर’ची भूमिका बजावतात अल्पमतात असताना ही दोन्ही गटांना जेरीस आणून देसाई गटाबरोबर युती करून सभापती-उपसभापती पदाचा बाजी मारला तर पाटणकर गटाबरोबर आघाडी करून उपसभापतिपद मिळवले़
या गटा-तटाच्या चढाओढीत मात्र आमदार विक्रमसिंह पाटणकर आणि माजी आमदार शंभूराज देसाई यांनी ढेबेवाडी विभागाला तर प्राधान्य दिलेच, शिवाय पदांचीही खैरात केली़ सध्या देसाई गटाने बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमनपद, पंचायत समितीचे सभापतिपद तर पाटणकर गटाने पाटण अर्बन बँकेचे चेअरमनपद, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापतिपद, याच विभागात देऊन समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे़ आता सभापतिपदाचे आरक्षण जाहीर झाले़ देसाई गटाकडे असा उमेदवार नसल्याने पाटणकर गटालाच ही लॉटरी लागली आहे़ विधानसभेच्या तोंडावर लागलेल्या लॉटरीचे बक्षीस पाटणकर ठेवणार की ढेबेवाडीकडे पाठवणार याकडे नजरा लागल्या आहेत़ (वार्ताहर)