वाई नगरपालिकेचा बहुमतावर अर्थसंकल्प मंजूर

By Admin | Updated: February 26, 2016 00:48 IST2016-02-26T00:42:20+5:302016-02-26T00:48:20+5:30

विरोधकांचा आरोप : अर्थसंकल्पात निधीचा महापूर; मात्र नियोजनाचा खडखडाट

Wai Municipality's Most Affordable Budget | वाई नगरपालिकेचा बहुमतावर अर्थसंकल्प मंजूर

वाई नगरपालिकेचा बहुमतावर अर्थसंकल्प मंजूर

वाई : येथील नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी माडंलेल्या विषयांना विरोधकांनी तीव्र विरोध करून प्रत्येक मुद्द्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. यावर सत्ताधारी, प्रशासन व लेखापाल यांना समाधानकारक उत्तरे देता न आल्याने बोलती बंद झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले़
दरम्यान, या सभेत सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर अर्थसंकल्प मंजूर केला आहे. अर्थसंकल्पात निधीचा महापूर मात्र नियोजनाचा खडखडाट आहे, असा आरोप विरोधकांनी केला.
वाई नगरपालिकेचा २०१६-१७ चा वार्षिक अर्थसंकल्प मंजुरीसाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते़ नगराध्यक्ष भूषण गायकवाड, उपनगराध्यक्षा सुरेखा जाधव, मुख्याधिकारी आशा राऊत व लेखापाल प्रविणा ओसवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिकेच्या छ़ शिवाजी महाराज सभागृहात ही सभा पार पडली़
वाई नगरपालिकेतील सत्ताधारी तीर्थक्षेत्र आघाडीने सभागृहापुढे २७ कोटी २१ लाख ६१ हजार ३४० रुपयांचा अर्थसंकल्प ठेवला होता़ हा अर्थसंकल्प सत्ताधाऱ्यांना विरोधकांचा विरोध धुडकावून बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात यश आले़ कर्मचाऱ्यांचा राखीव वेतन निधी, निवृत्तीवेतन निधी, जल शौचकुप रूपांतर निधी, पाणीपुरवठा राखीव निधी, कर्ज निवारण राखीव निधी, सर्वसाधारण राखीव निधी, वृक्षसंवर्धन राखीव निधी, घसारा राखीव निधी, बुडीत राखीव निधी, या निधींच्या संदर्भात सत्ताधारी व पालिका प्रशासनाने जी आकडेवारी सभागृहापुढे मांडली होती. त्यासंदर्भात विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित करत नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व प्रशासनातील सर्व अधिकारी यांना अनुत्तरीत केले. त्यामुळे त्यांची कोंडी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले़
कृष्णा नदीत पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध प्रकल्प उभारावेत, तसेच पालिकेची विश्वासहर्ता रसातळाला पोहोचली आहे़ यासारखे अनेक गंभीर आरोप नगसेवक सचिन फरांदे, महेंद्र धनवे यांनी केले. अर्थसंकल्पात अनेक विषयांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचाही आरोप करण्यात आला. चर्चेत नगरसेवक डॉ़ अमर जमदाडे, कैलास जमदाडे, दत्तात्रय खरात, सुभाष रोकडे, धनंजय मोरे, शोभा शिंदे, वर्षा शेवडे, सीमा नायकवडी, शर्मिला जाधव, पद्मा पिसाळ आदींनी सहभाग घेतला़
आरोग्य अधिकारी नारायण जाधव, राजन बागुल, राजेंद्र गायकवाड, दीपक गोंजारी आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Wai Municipality's Most Affordable Budget