दूषित पाण्याने वाईत काविळीची साथ
By Admin | Updated: November 12, 2014 22:52 IST2014-11-12T21:51:15+5:302014-11-12T22:52:29+5:30
शंभर पेक्षा जास्त रुग्णांवर वाईच्या विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

दूषित पाण्याने वाईत काविळीची साथ
वाई : वाई बाजार समितीच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे दूषित पाणी पिल्याने बाजार समितीत व्यापाऱ्याच्या निमित्ताने येणाऱ्या शेतकरी व व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात काविळीची लागण झाली आहे. शंभर पेक्षा जास्त रुग्णांवर वाईच्या विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. वाईसह संपूर्ण तालुक्यात काविळीच्या साथीने थैमान घातले आहे. गेल्या चार दिवसांपासून काविळीचे रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये खिशाला चाट लावून उपचार घेत आहेत. वाईच्या ग्रामीण रुग्णालयात ना डॉक्टर, ना जागा, ना काविळीची लस उपलब्ध आहे. ग्रामीण रुग्णालयात येणारे रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये पाठविण्यात येत असल्याने संतापाची लाट उसळली आहे.वाई शहरात काविळीची साथ जोमाने पसरल्याचे भारतीय जनता पक्षाचे काशिनाथ शेलार, अविनाश फरांदे, शिवसेनेचे विवेक भोसले, चेतन नायकवडी, विशाल मोरे, संदीप जायगुडे यांनी उघड करून बाजार समितीच्या सचिवांना धारेवर धरले. वाईचे तहसीलदार सदाशिव पटदुणे, पालिकेच्या मुख्याधिकारी आशा राऊत, नगराध्यक्ष भूषण गायकवाड यांनी रुग्णालयाला भेट दिली. तहसीलदारांनी डॉक्टर अंजली पतंगे यांच्याशी चर्चा करून बाजार समितीच्या विहिरीचे पाणी तत्काळ बंद करण्याचे आदेश देत वाई पालिकेला उपाययोजना म्हणून बाजार समितीत येणाऱ्या शेतकरी, व्यापाऱ्यांसाठी ट्रॅक्टरने पाणीपुरवठा करण्यासंबंधी सूचना
केल्या. (प्रतिनिधी)