वडूजला लागलंय नगरपंचायतीचे वेध
By Admin | Updated: November 21, 2015 00:24 IST2015-11-20T21:22:51+5:302015-11-21T00:24:23+5:30
ग्रामपंचायतीवर वाढता ताण : ग्रामस्थांच्या आशा पल्लवित; जोरदार चर्चा सुरू--गाव होतंय मोठं - एक

वडूजला लागलंय नगरपंचायतीचे वेध
शेखर जाधव -- वडूज -खटाव तालुक्याची राजधानी म्हणून वडूज शहराची एक वेगळी ओळख तर आहेच; परंतु त्याचबरोबरीने हुतात्म्यांची भूमी म्हणून राज्यालाही हे शहर परिचित आहे. २५ हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या वडूज शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. तर नागरिकांना सोयी-सुविधा देताना ग्रामपंचायतीवर पडणारा अतिरिक्त ताण ही नगरपंचायत झाल्यास जाणवणार नाही. त्यामुळे वडूज नगरपंचायत होणार या नुसत्या चर्चेमुळे वडूजमधील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
संभाव्य नगरपंचायतीचे शिल्पकार कोण? यासाठी लवकरच ‘फ्लेक्स वॉर’ सुरू होईल. मात्र त्यापूर्वीच चौकाचौकात संभाव्य उमेदवारांचे वाढदिवसानिमित्त अथवा इतर सामाजिक उपक्रमाचे बोर्ड झळकू लागले आहेत. नगरपंचायत जाहीर होण्यापूर्वीच वडूजमधील राजकीय वातावरणाने चांगलाच पेट घेतला आहे. दिवाळीपूर्वी व दिवाळीनंतर या ना त्या कारणाने वडूज परिसरात फटाक्यांची आतषबाजी होत आहे. मोहित करणारे आकाशातील फटाके आणि कर्णकर्कश फटाके, यामुळे नगरपंचायतीचा बिगुल वाजला हे न समजणारे वडूजकर तर मग कसले!
वडूज नगरपंचायतीला पहिला नगराध्यक्ष व नगरसेवक बनण्यासाठीही अनेकांनी आतापासूनच व्यूहरचना आखली आहे. तर प्रभाग कसे पडणार, आपला पत्ता कसा चालेल, यासाठी इच्छुकांनी कंबर कसली आहे. साम, दाम, दंड यांची रंगीत तालीम ही सुरू आहे. नगरपंचायत होणार या चर्चेतच वडूज नगरी बरोबरीने खटाव तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळले आहे.
आता मात्र शिवसेना-भाजप, रासप व इतर पक्षांनाही नगरपंचायतीमुळे संधी प्राप्त होऊ शकते.
वडूज नगरपंचायत होणार यामुळे ग्रामीण भागातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी नि:श्वास सोडला असून, आता आपल्याला जिल्हा परिषद सदस्य होण्यास कोणीच रोखू शकत नसल्याचे स्वप्न पडू लागली आहेत. नगरपंचायतीच्या दिव्यस्वप्नात स्थानिक नेते मंडळी हरवलेली असली तरी ब्रह्मअस्त्रांचा राजकीय माऱ्याला ते कसे तोंड देतात हा येणारा काळच ठरवणार आहे. या बातमीमुळे वडूजचे नागरिक सुखावले असले तरी नेमका काय फायदा व तोटा, याकडे न पाहता आता सोयी-सुविधा मिळणार याच आनंदोत्सवात आदेशाची वाट पाहत दिवाळी सुटीचा उपभोग घेत आहेत.
राजकीय नेत्यांचे महत्त्व होणार कमी?
जिल्ह्याच्या व तालुक्याच्या राजकारणात वडूच्या नेत्यांना आत्तापर्यंत राजकीय अनन्य साधारण महत्त्व होते. मात्र नगरपंचायतीनंतर हे महत्त्व कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सत्तेच्या समीकरणात काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्हीच पक्षांचा अदलाबदल करून समावेश असायचा.
हुतात्म्यांची भूमी असा राज्यात ठसा
वडूज शहर खटाव तालुक्याची राजधानी असले तरीही त्याला हुतात्म्यांची भूमी म्हणून राज्यात ओळख आहे. स्वातंत्र्य संग्रामात येथील भूमीचे आणि भूमीपूत्रांचे योगदानही मोठे आहे.