वडूज आठ दिवस पाण्याविना!

By Admin | Updated: March 31, 2016 00:09 IST2016-03-30T22:21:44+5:302016-03-31T00:09:30+5:30

ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार : कामानिमित्त येणाऱ्यांचीही होतेय गैरसोय

Waduz 8 days without water! | वडूज आठ दिवस पाण्याविना!

वडूज आठ दिवस पाण्याविना!

वडूज : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहरास येरळा तलावङ्कमधून पाणीपुरवठा होत असतो. सुमारे एकोणत्तीस हजार लोकवस्ती असलेल्या वडूज शहरात सर्वच प्रमुख शासकीय कार्यालये, दवाखाने आणि इतर सुविधा असणारे मुख्य केंद्रे आहेत. त्यामुळे तालुक्याच्या टोकावरून ये-जा करणाऱ्यांची नेहमीच वडूज परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने स्वाभाविकच पाणी जादा लागते. परंतु गेल्या आठ दिवसांपासून वडूज शहराचा पाणीपुरवठा बंद झाल्याने वडूजकरांसह ये-जा करणाऱ्यांचे पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे दृश्य पाहायाला मिळत आहे.
वडूज शहरात पाण्याची टंचाई भासू लागल्यानंतर पाणी बचतीचे नव-नवीन फंडे सुरू झाले. नेहमी मोठ्या टपात पाणी साठा करून खळखळून धुणे धुणाऱ्या महिला आता छोट्या घमेल्यात पाणी घेऊन कपडे धुवत असल्याचे चित्र पाहायला मिळते. धुणे धुवून उर्वरित पाणी पूर्वी रस्त्यावर सडा मारण्यासाठी वापरले जायचे आता हे पाणी झाडांसाठी वापरले जात आहे. आठ दिवस पाणी न आल्याने वडूजकरांना पाण्याचे महत्त्व पटल्याने पाणी बचत कशी करावी हे अखेर समजले. बहुतांशी घरात व अन्य ठिकाणी इंधन विहिरी (बोअरवेल) असल्यामुळे पाण्याची टंचाई काही दिवस जाणवली नसली तरी इतर ठिकाणाहून पाणी घेण्यासाठी लोकांची होणारी वर्दळ पाहता बोअरधारकांनाही पाण्याचे महत्त्व आपसूकच कळले.
येरळवाडी येथील येरळा तलावातून वडूजची प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना मधून वडूज शहराला पाणीपुरवठा होतो. वडूज शहराची कुटुंब संख्या ३७०० असून, प्रशासनाकडे नोंद असलेली लोकसंख्या १७ हजार ६३४ आहे. प्रत्यक्षात ही लोकसंख्या २९ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. या लोकसंख्येचा दैनदिन सुमारे १० लाख लिटर पाणी लागते. तालुक्यात कितीही मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई झाली तरी वडूजला पाणीपुरवठा सुरळीत होता. यापूर्वी सुरळीत पाणीपुरवठा व्हावा म्हणून ग्रामपंचायत सदस्य स्वत: लक्ष घालून कार्यरत आहेत. मात्र यावेळी आठवडा उलटला तरी या विषयाकडे डोळेझाक झाली. याला ग्रामपंचायत जबाबदार असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.
प्रारंभी येरळा तलाव जवळील वीज जोड असलेली केबल खराब झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ती केबल तत्काळ दुरुस्त करण्यासाठी दोन दिवस गेले. परंतु पुन्हा मोटारीचा स्टॉटर मधील कार्ड जळाल्याचे लक्षात आले. या नळपाणीपुरवठा योजेनसाठी दुसरी पर्यायी यंत्रणा सज्ज असणे आवश्यक असताना दुसरी पर्यायी योजना बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. ही सर्व दुरुस्ती करण्यासाठी काही कर्मचारी सांगलीकडे रवाना झाल्याच्या वृत्ताला ग्रामविस्तार अधिकारी काझी यांनी दुजोरा दिला. या नळपाणीपुरवठा बंदच्या काळात वडूजमधील नागरिकांना पाण्याचे महत्त्व जरी तात्पुरते कळाले असले तरी वडूज परिसरात पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत असतो हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही.
नेहमी पाणी आले की रस्त्यावर सडा, पाणी भरून झाले की नळाला कॉक न लावता ते पाणी गटारात सोडून देणे अशा प्रवृत्तीला आळा घालणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)


४वडूज शहराची व्याप्ती पाहता आणि नेहमीच ऐन उन्हाळ्यात बंद पडणारी ही जलदायी योजना, स्वच्छ पाण्यासाठी टाकण्यात येणारे घटक आणि कर्मचाऱ्यांची शासकीय पातळीवर नि:पक्षपाती चौकशी व्हावी, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य विवेक येवले यांनी केली आहे.
४काही तांत्रिक अडचणीमुळे काही दिवस शहरातील पाणीपुरवठा खंडित झालेला होता. तो लवकरच सुरू होईल यापुढे उन्हाळ्यात वडूज शहराला पाणी कमी पडणार नाही यासाठी सुद्धा ग्रामपंचायतीने भरीव काम केले आहे. तरीसुद्धा नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन ही ग्रामविस्तार अधिकारी चाँद काझी यांनी केले.

Web Title: Waduz 8 days without water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.