तीन ग्रामपंचायतींसाठी २३ रोजी मतदान
By Admin | Updated: November 9, 2014 23:26 IST2014-11-09T22:08:35+5:302014-11-09T23:26:34+5:30
फलटण तालुका : सहा जागा राहणार रिक्त; मोझरी बिनविरोध होण्याची शक्यता

तीन ग्रामपंचायतींसाठी २३ रोजी मतदान
फलटण : फलटण तालुक्यात माझेरी, गोळेवाडी, उळुंब या तीन पुर्नवसित गावठाणातील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक आणि आसू व ढवळेवाडी या दोन ग्रामपंचायतीमधील प्रत्येकी एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी रविवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
माझेरी, गोळेवाडी आणि उळुंब या तीन ग्रामपंचयतीमधील प्रत्येकी ७ जागा आणि आसू व ढवळेवाडी येथील दोन जागांच्या पोटनिवडणुकीसाठी उमेद्वारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शनिवारी एकूण १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले, तर ६ जागांसाठी अर्जच दाखल न झाल्याने या जागा रिक्त राहणार आहेत.
माझेरी ग्रामपंचायतीमधील ७ जागांपैकी ओबीसी महिला व ओबीसी सर्वसाधारण या दोन जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने त्या रिक्त राहणार आहेत. सर्वसाधारण १ व सर्वसाधारण महिला २ जागांसाठी प्रत्येकी एक-एक अर्ज आल्याने या जागांची निवड बिनविरोध झाली आहे. सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला राखीव या जागांसाठी प्रत्येकी २ उमेदवारी अर्ज आल्याने या दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे. तथापि, दि. १२ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असल्याने त्यावेळी दोन अर्ज मागे घेतले गेले तर संपूर्ण ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
गोळेवाडी येथील एकूण ७ जगांपैकी ओबीसी महिला २ जागा आणि अनुसूचित जाती महिला १ जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने या जागा रिक्त राहणार आहेत. उर्वरित पैकी ३ जागांसाठी प्रत्येकी १ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या जागांची निवड बिनविरोध होणार आहे, तर एका सर्वसाधारण जागेसाठी २ अर्ज दाखल झाल्याने या जागेसाठी निवडणूक होणार आहे.
उळुंब येथील ७ पैकी ४ जागांची निवड बिनविरोध झाली आहे, तर ओबीसी महिला व ओबीसी सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती महिला जागेसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने या जागा रिक्त राहणार आहेत.
आसू ग्रामपंचायतीमधील एका जागेसाठी एकच अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे तर ढवळेवाडी येथील एका जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ही जागा रिक्त राहणार आहे. (प्रतिनिधी)
आज अर्जांची छाननी
दाखल उमेदवारी अर्जांची छाननी सोमवार दि. १० रोजी करण्यात येणार असून, बुधवार दि. १२ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. रविवार दि. २३ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान घेण्यात येणार असून, सोमवार दि. २४ रोजी तहसील कार्यालय फलटण येथे मतमोजणी व नंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.