वाळूवाले जोमात; प्रशासन कोमात!

By Admin | Updated: December 2, 2014 00:48 IST2014-12-01T20:51:40+5:302014-12-02T00:48:09+5:30

नियम धाब्यावर : अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची चाळण

Volleyball; Admin comat! | वाळूवाले जोमात; प्रशासन कोमात!

वाळूवाले जोमात; प्रशासन कोमात!

पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात अवैध वाळू वाहतूक जोमाने सुरू असून, सगळे नियम धाब्यावर बसवून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक होत असल्यामुळे आणि महसूल यंत्रणा याबाबत गंभीर नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ट्रक आणि ट्रॅक्टरमधून सर्रास दिवसाढवळ्या वाहतूक सुरू असल्यामुळे वाळूवाले जोमात अन् प्रशासन कोमात असं म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर येऊन ठेपली आहे.
शहरीकरण वेगाने वाढत असल्यामुळे आणि बांधकाम व्यवसायाचा वाळू हा अविभाज्य घटक असल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागांत वाळूचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या व्यवसायाकडे अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण वळू लागले आहेत. त्यातच बाहेरून वाळूची मागणी करून गरजेप्रमाणे पुरवठा केल्यास बक्कळ कमिशन मिळत असल्यामुळे या व्यवसायाकडे बघण्याची तरुणांची मानसिकता बदलली आहे. त्यामुळे अगदी खेड्यापाड्यांत ‘दादां’ची संख्या वाढू लागली आहे.
वाळूतस्करी रात्री-अपरात्री केली जाते. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील बांधकामाने म्हसवड, कऱ्हाड, फलटण परिसरातील वाळूला मोठी मागणी आहे. त्यामुळे रात्रीवेळी वाळू वाहतूक करणारे ट्रक चालू असतात. खुलेआम सुरू असलेल्या या उद्योगामुळे वाई-वाठार, तडवळे सं., वाघोली-पिंपोडे बुद्रुक रस्त्याची चाळण झाली आहे.पोलीस खात्यासह महसूल विभागाच्या वरिष्ठ पातळीवरून याकडे दुर्लक्ष केले जात असून, यामध्ये नजीकच्या काळात व्यावसायिक स्पर्धा निर्माण होऊ शकते.
पोलिसांदेखत महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून व्यवसाय सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिक आश्यर्च व्यक्त करीत आहेत. दिवसेंदिवस वाळू व्यवसाय जोमाने सुरू असून, संबंधित प्रशासन मात्र कोमात गेल्यासारखी परिस्थिती पिंपोडे बुद्रुक येथे निर्माण झालेली
आहे. (वार्ताहर)

उपायोजना करण्याची मागणी
फौजदारी गुन्हे दाखल होवून आणि एकावेळी ५० हजार रुपयांचा दंड होऊनही वाळू माफिया आपला व्यवसाय सुरू ठेवतात. पोलिसांच्या नाकावर टिच्चून आणि पोलीस ठाण्यासमोरून वाळू वाहतूक केली जाते.
काही वेळा महसूल यंत्रणेच्या भरारी पथकाचा डोळा चुकवून देखील वाळू वाहतूक केली जाते. मात्र याकडे कोणाचेही लक्ष नाही. सततच्या वाहतुकीमुळे पिंपोडे बुद्रुक येथे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.
खराब रस्त्यामुळे ग्रामस्थांसह वाहनचालकांना वाहतुकीदरम्यान अनेक अडचणींना सामारे जावे लागत आहे. प्रशासनाने तत्काळ अवैध वाळूवाहतुकीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.


पंधरा दिवसांपूर्वी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करुन संबंधितांकडून ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच संबंधितांवर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. सध्या तहसील कार्यालयात ७/१२ संगणकीकरणाचे काम सुरु आहे. असे असले तरी तालुक्यात अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्यांची कसलीच गय केली जाणार नाही.
- अर्चना तांबे, तहसीलदार


पिंपोडे-बुदु्रक ते तडवळे या रस्त्यावर गेली अनेक दिवस अवजड वाहतूक सुरू आहे. यामुळे हा रस्ता अतिशय खराब झाला असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून चारचाकी वाहने तर सोडाच पण सायकल चालविणेदेखील जिकीरीचे झाले आहे. प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन रस्ता दुरुस्ती करण्याबरोबरच अवडज वाहतुकीवर बंदी आणणे गरजेचे आहे.
- सुरेश लेंढे, ग्रामस्थ, पिंपोडे बुद्रुक

Web Title: Volleyball; Admin comat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.