वाईत पाटील-शिंदेंमध्ये चुरस
By Admin | Updated: April 27, 2015 00:13 IST2015-04-26T23:01:12+5:302015-04-27T00:13:23+5:30
सोसायटी मतदार संघ : उमेदवारांचा वैयक्तिक भेटी-गाठींवर भर

वाईत पाटील-शिंदेंमध्ये चुरस
संजीव वरे - वाई सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक अनेक कारणांनी गाजला असतानाच अखेरच्या क्षणी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, खासदार उदयनराजे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रभाकर घार्गे, अनिल देसाई यांची बिनविरोध निवड झाली. वाई तालुक्यात मात्र सोसायटी मतदार संघात पहिल्यांदाच निवडणूक लढवित असलेले नितीन पाटील व पश्चिम भागाचे नेते बापूसाहेब शिंदे यांच्यात होत असल्याने मोठी उत्सुकता लागली आहे. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात जास्तीत जास्त सोसायटी असून, पश्चिम भागाचे नेते बापूसाहेब शिंदे यांचेही काही सोसायट्यांवर वर्चस्व आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे.वाई तालुक्यात अनेक गावांत सोसायटीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठरावासाठी राष्ट्रवादीने आघाडी घेतली होती. या निवडणुकीत नितीन पाटील यांच्या विरुद्ध बापूसाहेब शिंदे यांचा अर्ज राहिल्याने मोठी रंगत चढली आहे. एकीकडे आमदार मकरंद पाटील व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व दुसरीकडे पश्चिम भागाचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब शिंदे यांनाही निवडणुकीचा खूप अनुभव आहे. तालुक्यात एकीकडे राष्ट्रवादीची अनेक संस्थांमध्ये सत्ता असताना पश्चिम भागात मात्र पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या दोन जागा विकास शिंदेंच्या नेतृत्वाखाली मिळाल्या होत्या. अनेक गावांमध्ये बापूसाहेब शिंदे यांचे राजकीय संबंध चांगले आहेत.
निवडणूक होणार रंगतदार...
गेली अनेक वर्षे बापूसाहेब शिंदे अनेक निवडणुका लढले आहेत. त्यामुळे नितीन पाटील यांच्या समोर बापूसाहेब शिंदे यांचे आव्हान असून, ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व बापूसाहेब शिंदे यांच्याकडून मतदारांच्या वैयक्तिक भेटी-गाठी घेण्याचा जोर वाढला आहे. तर काही ठिकाणी बैठका होत आहेत.