गावकारभाऱ्यांनो....कडक पावले उचलण्याची गरज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:36 IST2021-04-19T04:36:07+5:302021-04-19T04:36:07+5:30
औंध :कोरोनाच्या लाटेत खटाव तालुक्यातील अनेक गावे आता ‘हॉटस्पॉट’च्या दिशेने वाटचाल करू लागली आहेत. गेल्यावर्षीच्या कोरोनाच्या लाटेत ग्रामीण भागापेक्षा ...

गावकारभाऱ्यांनो....कडक पावले उचलण्याची गरज!
औंध :कोरोनाच्या लाटेत खटाव तालुक्यातील अनेक गावे आता ‘हॉटस्पॉट’च्या दिशेने वाटचाल करू लागली आहेत. गेल्यावर्षीच्या कोरोनाच्या लाटेत ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात व शहरातून आलेल्या नागरिकांना लागण होत होती. मात्र, आता ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यांत कोरोनाने आपले हातपाय पसरले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक गावकारभाऱ्यांनी कडक पावले उचलण्याची गरज वाटू लागली आहे.
गेल्यावर्षी खटाव तालुक्यात दि. ५ मे २०२० रोजी खरशिंगे येथे २१ वर्षीय युवक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने संपूर्ण खटाव तालुका हादरून गेला होता. एक रुग्ण सापडल्याच्या चर्चेने सोशल मीडियावर बातम्या फिरू लागल्या अन् खटावकरांची झोपच उडाली होती व आज रोजी तालुक्यात दररोज ५०, १००, २०० रुग्ण सापडत आहेत. आमच्याकडे कोरोना नाही म्हणणाऱ्या गावात कोरोना तळ ठोकून आहे. त्यामुळे गावपातळीवर सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, कृती समिती व स्वयंसेवकांना पुन्हा आहे, त्यापेक्षाही अधिक प्रमाणात काम करावे लागणार आहे. कोणी ऐकत नसेल तर संबंधितावर कडक पावले उचलण्याची वेळ आली आहे.
खटाव तालुक्यात अनेक ठिकाणी काळजीने लॉकडाऊन पाळले जात आहे. गांभीर्याने त्याकडे पाहणारी अनेक गावे आहेत; पण काही गावे वेगळ्याच अविर्भावात मिरवत आहेत. आपल्याकडे येत नाही म्हणणाऱ्या गावांच्या वेशीला येऊन कोरोना धडकल्याने आता तरी त्यांचे डोळे उघडणार का, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
चौकट..
कोरोनाची लढाई सर्वांचीच..!
कोरोनाची लढाई ही सर्वांची आहे. मात्र अजूनही त्यात कारण-राजकारण आडवे येत आहे. कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी प्रत्येकाने आपल्या गावासाठी वेळ देणे आवश्यक आहे, जे स्वयंस्फूर्तीने काम करतात त्यांच्या पाठीवर निदान शाबासकीची थाप टाका व हातात हात घालून कोरोनाची लढाई लढण्याची वेळ आली आहे.